पीटीआय, नवी दिल्ली : अमेरिकेचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हान्स निमन फसवणूक करून सामने जिंकत असल्याचा आरोप जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने केला आहे. कार्लसनने नुकतीच ज्युलियस बेअर जनरेशन चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. या स्पर्धेदरम्यान कार्लसनने निमनविरुद्धचा सामना केवळ एक चाल खेळून सोडला होता. हा त्याचा या स्पर्धेतील एकमेव पराभव होता. त्यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सिनक्वेफील्ड चषक स्पर्धेतून कार्लसनने अचानक माघार घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निमनकडून अनपेक्षित पराभूत झाल्यानंतर कार्लसनने हा निर्णय घेतला, तेव्हा निमनने बहुधा फसवणूक करून डाव जिंकला, अशी चर्चा सुरू झाली. या सर्व प्रकरणावर आता कार्लसनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘निमनने फसवणूक करून सामने जिंकत असल्याचे यापूर्वी मान्य केले होते. मात्र, अलीकडच्या काळात त्याने अधिकाधिक फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याने पटावरील बुद्धिबळात केलेली प्रगती शंका निर्माण करणारी आहे. सिनक्वेफील्ड चषकातील आमच्या सामन्यादरम्यान त्याच्यावर दडपण आहे किंवा महत्त्वाच्या चालींच्या वेळी तो लक्षपूर्वक खेळत आहे, असे मला जाणवले नाही. त्याने काळय़ा मोहऱ्यांसह खेळताना मला पराभूत केले, जे केवळ काही खेळाडूंनाच शक्य आहे,’’ असे कार्लसन म्हणाला. निमनने यापूर्वी दोन वेळा ऑनलाइन बुद्धिबळ सामन्यांमध्ये फसवणूक केल्याचे मान्य केले आहे. मात्र, पटावरील बुद्धिबळ सामन्यांत आपण कधीही फसवणूक केली नसल्याचा निमनने म्हणाला होता. ‘‘फसवणुकीमुळे बुद्धिबळ या खेळाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संयोजक आणि बुद्धिबळ या खेळाच्या पावित्र्याची काळजी असलेल्या सर्वानी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्यासाठी आणि फसवणूक शोधण्याच्या पद्धतींसाठी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे कार्लसनने नमूद केले.

निमनशी सामने खेळण्यास नकार!

फसवणुकीसारखी कृती करणाऱ्या खेळाडूविरुद्ध आपण यापुढे सामने खेळणार नसल्याचेही कार्लसनने स्पष्ट केले आहे. ‘‘खेळात फसवणुकीबाबत आपण काहीतरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंचा वारंवार फसवणूक करण्याचा इतिहास आहे, त्यांच्याविरुद्ध मी सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ते भविष्यात काय करतील हे कोणालाही ठाऊक नाही,’’ असे कार्लसन म्हणाला. मात्र, १९ वर्षीय निमन पटावरील बुद्धिबळ सामन्यांत कशा प्रकारे फसवणूक करतो याचे पुरावे देणे कार्लसनने टाळले. ‘‘मला अजून काही गोष्टी बोलायच्या आहेत. परंतु निमनच्या परवानगीशिवाय ते शक्य नाही. मी केवळ माझ्या कृतीतून बोलू शकतो आणि यापुढे मी निमनविरुद्ध खेळणार नाही हे स्पष्ट आहे,’’ असेही कार्लसनने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carlson american chess player accused hans nieman fraud ysh
First published on: 28-09-2022 at 00:02 IST