Carmi le Roux and Ryan Rickelton Video Viral in MLC 2024 : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा घटना घडतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजला कोण विसरू शकेल? क्रिकेटच्या मैदानावरच त्याचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये फलंदाजी करताना बाऊन्सर लागून त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानावर कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाली की लगेचच लोक त्याची आठवण काढतात. आता अमेरिकेत घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण गोलंदाजी करत असताना वेगवान चेडूं गोलंदाजाच्या डोक्यात लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुधवारी नॉर्थ कॅरोलिना येथील मॉरिसविले येथील चर्च स्ट्रीट पार्क येथे मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) सामन्यादरम्यान सिएटल ऑर्कास विरुद्ध खेळताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा आउटफिल्डर कार्मी ले रॉक्सच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली, जेव्हा ली रॉक्स ऑर्कासचा फलंदाज रयान रिकेल्टनला ओवर द विकेट गोलंदाजी करत होता.

कार्मी ले रॉक्सने ऑफ-स्टंपच्या अगदी बाहेर फुल टॉस चेंडू टाकला आणि रिकेल्टनने समोरच्या दिशेने जोरदार फटका मारला. ले रॉक्सला काही समजण्यापूर्वीच चेंडू त्याच्या डोक्याला लागला. त्याला प्रतिक्रिया द्यायला वेळ नव्हता आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. मैदानावर उपस्थित पंचांनी तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण केले. यानंतर ले रॉक्सला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि त्याच्या जागी कोरी अँडरसनने षटक पूर्ण केले.

हेही वाचा – Somerset vs Yorkshire : ‘दोस्त दोस्त ना रहा…’, पाहा नॉन-स्ट्रायईकरचा सहकारीच कसा बनला फलंदाजाचा शत्रू

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स जिंकला सामना –

सदर फ्रँचायझीने त्यांच्या वेबसाइटवर किंवा सोशल मीडिया चॅनेलवर या घटनेबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. ले रौक्सला या सामन्यात केवळ १.४ षटके गोलंदाजी करता आली. या दरम्यान त्याने ११ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने हा सामना २३ धावांनी जिंकला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने २० षटकांत ७ गडी बाद १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सिएटल ऑर्कास संघाला २० षटकांत ६ बाद १४२ धावाच करता आल्या.