Case Filed Against Hardik Pandya: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर भारतीय खेळाडूंना विजयाचा जोरदार जल्लोष केला. हार्दिक पंड्याचे जल्लोष करत असतानाचे डान्स करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण आता वर्ल्डकप झाल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भारतीय ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हार्दिक पंड्याला या स्पर्धेत जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं. त्यामुळे या विजयात हार्दिकचाही मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्याने आपली प्रेयसी महिका शर्मासोबत मिळून मैदानावरच जोरदार जल्लोष साजरा केला. दोघांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. एकीकडे त्याने केलेल्या कामगिरीचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील वाजिद खान यांनी पत्र लिहून हार्दिक पंड्यावर एफआयआर करण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी मैदानावर जल्लोष साजरा केला. तर हार्दिक पंड्याने जल्लोष करत असताना भारतीय ध्वज आपल्या अंगाभोवती गुंडाळला होता. जे राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे, असा आरोप वकिलांकडून करण्यात आला आहे.

वकिलांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा’, १९७१ च्या कलम २ चा हवाला देत असे म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वाचा अपमान होता कामा नये. ही तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. ज्यावेळी ते तक्रार करण्यासाठी पोलिस स्थानकात गेले त्यावेळी त्यांना असं सांगण्यात आलं की, ही घटना तर अहमदाबादमध्ये घडली आहे. पण वकिलांनी त्यांना सांगितलं की, राष्ट्रध्वज हा संपूर्ण देशाचा प्रतिक आहे. त्यामुळे तक्रार कुठल्याही पोलिस स्थानकात नोंदवली जाऊ शकते. त्यानंतर पोलिसांनी हार्दिक पंड्याविरोधात तक्रार नोंदवली. आता पोलिसांकडून चौकशी गेली जाणार आहे. आता पोलिस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच हार्दिक पंड्या यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.