Prize Money For Ranji Trophy Champion Jammu- Kashmir: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील अंतिम सामना जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे हा सामना जिंकून जम्मू-काश्मीर संघाकडे इतिहास रचण्याची संधी होती. जम्मू-काश्मीर संघाकडून अशीच काहीशी कामगिरी पाहायला मिळाली. जम्मू-काश्मीर संघातील फलंदाजांनी २ डावात दमदार फलंदाजी केली आणि कर्नाटक संघाला एकदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली. दरम्यान ६७ वर्षांनंतर पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.
रणजी ट्रॉफी विजेत्या संघावर बक्षिसाचा वर्षाव
या सामन्यातील पहिल्या दिवसापासून जम्मू-काश्मीर संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर जम्मू-काश्मीरचा संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार हे निश्चित झालं होतं. त्यामुळे सामन्यातील पाचव्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या रणजी ट्रॉफी विजयाचा जल्लोष करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी देखील हजेरी लावली होती. जम्मू-काश्मीर संघाने जेतेपदाचा मान पटकावल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी मैदानात जाऊन खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर विजयी संघासाठी २ कोटी रूपयांचं बक्षीस जाहीर केलं. ही बक्षिसाची रक्कम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांमध्ये विभागली जाणार आहे.
गेल्या ६७ वर्षांपासून जम्मू-काश्मीरचा संघ पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत होता. अखेर २०२६ मध्ये हे स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे खेळाडूंनीही जोरदार जल्लोष केला. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या विजयानिमित्त ‘X’ वर एक पोस्ट केली आणि खेळाडूंचं कौतुक केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “जम्मू-काश्मीरचा सुवर्णकाळ आला आहे. आमच्या क्रिकेट संघाने रणजी करंडक जिंकल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. आपल्या हिमतीच्या जोरावर इतिहास रचणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आणि संपूर्ण राज्याचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
जम्मू- काश्मीर संघाचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत, जम्मू-काश्मीर संघातील फलंदाजांनी पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभम पुंडीरने सर्वाधिक १२१ धावांची खेळी केली. तर यावेर हसन खानने ८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघचा डाव अवघ्या २९३ धावांवर आटोपला. त्यामुळे जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना कामरान इकबालने नाबाद १६० धावा केल्या. तर साहिल लोत्राने नाबाद १०१ धावांची खेळी केली.
