scorecardresearch

वॉर्नला नामांकितांकडून श्रद्धांजली

‘एमसीजी’च्या खेळपट्टीवर वॉर्न २००६ मध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला होता.

मेलबर्न : गायक एल्टन जॉन, महान गोल्फपटू ग्रेग नॉर्मन आणि ‘सर्फर’ केली स्लेटर यांच्यासह अनेक नामांकितांनी बुधवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) लेग-स्पिनचा जादूगार दिवंगत गोलंदाज शेन वॉर्नच्या श्रद्धांजली सभेला उपस्थिती राखली. या सभेला उपस्थित राहणाऱ्या ५० हजारांहून अधिक चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचा अविरत जयघोष केला.

‘एमसीजी’च्या खेळपट्टीवर वॉर्न २००६ मध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला होता. वॉर्नचा ४ मार्चला वयाच्या ५२व्या वर्षी थायलंडच्या कोह समुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या निधनाची बातमी कळताच सर्वच स्तरावर शोक व्यक्त करण्यात आला.‘एमसीजी’वर पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत संगीत, अभिनय, व्यापार, गोल्फ, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांकडून त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

एल्टन जॉनने आपले ‘डोन्ट लेट द सन गो डाऊन ऑन मी..’ हे गाणे वॉर्नच्या मुलांना (ब्रूक, समर आणि जॅक्सन) समर्पित केले. वॉर्नची मुलेदेखील उपस्थित होती. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उपस्थिती राखली. जॉन आणि ब्रिटिश संगीतकार एड शिरन, रॉबी विल्यम्स आणि ख्रिस मार्टिन यांनी स्क्रीनवर चित्रफितीद्वारे हजेरी लावली. अभिनेते हुग जॅकमन आणि एरिक बाना यांनीदेखील आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांनीसुद्धा आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. वॉर्न हा मैदानात आणि मैदानाबाहेर देखील तितकाच चर्चेत असायचा. वॉर्नच्या मेलबर्न मैदानाबाहेरील पुतळय़ाजवळ चाहत्यांकडून श्रद्धांजली म्हणून बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे ठेवण्यात आली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebrities pay tribute to cricketer shane warne zws

ताज्या बातम्या