बंगळुरूस्थित सेंटर ऑफ एक्सलन्स भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. खेळातल्या बारकाव्यांवर काम करत खेळाडूंना ही संस्था तयार करते. मात्र प्रत्यक्षात हे केंद्र म्हणजे दुखापतग्रस्त खेळाडू आणि रिहॅब याचं केंद्र झालं आहे. गेल्या २० महिन्यात सेंटर ऑफ एक्ललन्सने ३२ खेळाडूंवर उपचार केले आहेत. यापैकी २० जण बीसीसीआयतर्फे वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतील आहेत. दुखापतींचं प्रमाण वाढल्यामुळे बीसीसीआयने केंद्राचं बजेट ३५ कोटींनी वाढवून १२७ कोटींवर नेलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
एप्रिल २००५ ते मार्च २०२६ या कालावधीत असंख्य खेळाडू सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाले. आयपीएल संपल्यानंतर दुखापतींचं प्रमाण वाढल्याचंही स्पष्ट झालं आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांनी वाढत्या दुखापतींमुळे संघ ठरवणे कठीण होत असल्याचं अनेकदा म्हटलं आहे. भारतीय संघ सातत्याने खेळतो.
गेल्या आठवड्यात भारताचा एक संघ जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला तर त्याचवेळी एक संघ वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळणार आहे. याचवेळी शेष भारत आणि जम्मू काश्मीर यांच्यात इराणी चषकासाठी मुकाबला झाला. भारत अ संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो आहे. भारताचा १९ वर्षांखालील संघही खेळतो आहे. काही दिवसात रणजी करंडक स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय संघ सातत्याने खेळत असल्यामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळच मिळत नाही. पुरुष आणि महिला संघ मिळून तब्बल ६८ खेळाडूंच्या दुखापतींवर उपचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही सेंटर ऑफ एक्सलन्समधल्या रिहॅब प्रक्रियेचा भाग होता हे स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात बीसीसीआयने औपचारिक माहिती दिली नाही. यंदाच्या आयपीएलनंतर मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहित तिथे दाखल झाला होता. विराट कोहली, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव हे चौघेही रिहॅबसाठी सेंटर ऑफ एक्लसन्स सेंटरमध्ये होते.
हार्दिक पंड्या फिट नसल्यामुळे भारतीय संघाला संघाची रचना बदलावी लागत आहे. त्याच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या नितीश कुमार रेड्डीलाही दुखापतींनी सतावलं आहे.
