कोलकाता : भारतीय तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकीवरुन नवनियुक्त अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यात खडाजंगी जुंपल्याने तिरंदाजी संघटनेचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. विद्यमान अध्यक्ष सुनील शर्मा यांनी २६ मे रोजी संघटनेची निवडणूक घेण्याबाबत काढलेली नोटीस ही ‘बेधडकपणे केलेले बेकायदेशीर कृत्य’ आहे, असे सांगत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे सरचिटणीस महा सिंह यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर तत्कालीन अध्यक्ष बीव्हीपी राव यांनी राजीनामा दिल्यानंतर ४ मे रोजी शर्मा यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शर्मा हे माजी अध्यक्ष व्ही. के. मल्होत्रा गटाचे मानले जातात. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासकीय समिती सदस्यांची बैठक न बोलावताच निवडणुकीबाबतची नोटीस काढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय सदस्यांना कार्यरत राहण्यास परवानगी दिली होती.

‘‘तिरंदाजी संघटनेची निवडणूक २६ मे रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नवी दिल्लीतील कार्यालयात होणार आहे. त्यात अर्ज भरण्याची तारीख १३ ते १५ मे, माघारीची अंतिम मुदत २० मे आहे,’’ असे शर्मा यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे. मात्र सरचिटणीस महा सिंह यांनी सर्व सदस्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये ही नोटीस अनधिकृत असल्याचे म्हटले आहे.

‘‘तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकीची ही नोटीस बघून मला धक्काच बसला. हे बेधडकपणे केलेले बेकायदेशीर कृत्य आहे. तिरंदाजी संघटना किंवा अन्य कोणत्याही क्रीडा संघटनेच्या घटनेनुसार निवडणुकीबाबतची नोटीस ही अध्यक्षांच्या विनंतीनंतर संघटनेचा सरचिटणीसच काढत असतो. त्यामुळे अध्यक्षांच्या सहीने काढलेली ही नोटीस पूर्णपणे अनधिकृत आहे. त्यामुळे कुणीही त्या नोटिशीला उत्तर देण्याची आवश्यकता नसून तिरंदाजी संघटनेला अजून अडचणीत आणू नका. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या निर्णयानंतरच मी निवडणुकीबाबतची नोटीस काढेन,’’ असेही सिंह यांनी ई-मेलमध्ये नमूद केले आहे.