सायना समीर पुढे नवे आव्हान !

गेल्या वर्षी स्विस खुल्या स्पर्धेपासूनच सुरू झालेल्या समीर वर्माचा प्रवास वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेपर्यंत येऊन थांबला.

(संग्रहित छायाचित्र)

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा

ऑल इंग्लंडमधील पराभवाचे नैराश्य झटकून विजेतेपद पटकावण्याचे लक्ष

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्विस स्पर्धेत भारतीय खेळाडूंसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणारी सायना नेहवाल तसेच गतविजेता समीर वर्मा यांच्यासमोर गतविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.

गेल्या वर्षी स्विस खुल्या स्पर्धेपासूनच सुरू झालेल्या समीर वर्माचा प्रवास वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेपर्यंत येऊन थांबला. त्याचबरोबर गेल्या वर्षी त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम ११व्या स्थानी झेप घेतली होती. ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेत्या केंटो मोमोटा याच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत समीरला पराभूत व्हावे लागले होते.

जागतिक क्रमवारीत १४व्या क्रमांकावर असलेल्या समीरला पहिल्याच फेरीत आपला मोठा भाऊ सौरभ याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दुखापतीला सामोरे जावे लागल्याने सौरभने या स्पर्धेतून माघार घेतली होती. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यानंतर समीरची दुसऱ्या फेरीत गाठ भारताच्या बी. साईप्रणीतशी पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत त्याला गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या विक्टर अ‍ॅक्सेलसेन याच्याशी झुंज द्यावी लागण्याची शक्यता आहे.

सायनाची ही या मोसमातील चौथी स्पर्धा आहे. इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाला मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्य फेरीत तर ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. ऑल इंग्लंड स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात सायनाला अतिसाराचा फटका बसला होता. त्यातून सावरणाऱ्या सायनाने स्विस स्पर्धेचे तिसरे जेतेपद पटकावण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगले आहे. याआधी सायनाने २०११ आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. साईप्रणीतला पहिल्या फेरीत इंग्लंडच्या राजीव ओसेफ याच्याशी झुंज द्यावी लागेल.

तिसरे मानांकन मिळालेल्या सायनाचा सलामीचा सामना पात्रता फेरीतील खेळाडूशी होणार असला तरी उपांत्य फेरीत तिच्यासमोर चीनच्या हे बिंगजियाओ हिचे आव्हान असणार आहे. वैष्णवी रेड्डी हिला इस्टोनियाच्या क्रिस्तिन कुबा हिचा सामना करावा लागेल.

पुरुष दुहेरीत, अर्जुन एमआर आणि रामचंद्रन श्लोक तसेच मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी त्याचबरोबर अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी हे भारतीय बॅडमिंटनपटू आपले नशीब अजमावणार आहेत. मिश्र दुहेरी प्रकारात प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांच्यावरच भारताची सारी मदार राहणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Challenge in front of indians to shock the depression of all england defeat

ताज्या बातम्या