Chamari Athapaththu Record: दुबईत महिला एशिया कप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि इंडोनेशिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूने असं काही करून दाखवलं, जे याआधी कुठल्याही खेळाडूला करता आलं नव्हतं. या सामन्यात गोलंदाजी करताना तिने अवघ्या ५ धावा खर्च केल्या आणि ७ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर तिने श्रीलंकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. यासह एशिया कप स्पर्धेत असा काही रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे, जो याआधी पुरुषांच्या आणि महिलांच्या एशिया कप स्पर्धेत कोणालाच करता आला नव्हता.
श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्यातील साखळी फेरीतील सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. हे मैदान फिरकी गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं. चमारी अटापट्टूने फायदा घेत, इंडोनेशियाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. या सामन्यात गोलंदाजी करताना तिने केवळ ३.३ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान अवघ्या ५ धावा खर्च केल्या आणि ७ फलंदाजांना माघारी पाठवलं. या दमदार गोलंदाजीच्या बळावर इंडोनेशियाचा संपूर्ण डाव अवघ्या ४९ धावांवर आटोपला. यासह श्रीलंकेने हा सामना ७५ धावांनी आपल्या नावावर केला.
अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच गोलंदाज
या कामगिरीच्या बळावर चमारी अटापट्टूने काही मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. चमारी अटापट्टू ही एशिया कप स्पर्धेच्या इतिहासात ६ किंवा त्याहून अधिक गडी बाद करणारी पहिलीच गोलंदाज ठरली आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना तिने हॅट्रिकही घेतली. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून हॅट्रिक घेणारी ती पहिलीच महिला गोलंदाज ठरली आहे. यासह तिच्या नावे आणखी एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. चमारी अटापट्टूची ही कामगिरी श्रीलंकेच्या महिला किंवा पुरुष गोलंदाजाने केलेली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह ती टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ गडी बाद करणारी जगातील दुसरीच कर्णधार ठरली आहे. याआधी अर्जेंटिनाची कर्णधार एलिसन स्टॉक्सने २०२२ मध्ये पेरू संघाविरुद्ध गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले होते.
श्रीलंकेचा दमदार विजय
या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. तरीदेखील श्रीलंकेने १२४ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना निलाक्षिका सिल्वाने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. या धावांचा बचाव करताना चमारी अटापट्टूने ७ गडी बाद करून श्रीलंकेला एकतर्फी विजय मिळवून दिला.
