लंडन : करीम बेन्झेमाच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील सलग दुसऱ्या हॅट्ट्रिकच्या बळावर रेयाल माद्रिदने बुधवारी उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत चेल्सीला ३-१ असे नामोहरम केले.

बेन्झेमाने या हंगामात आतापर्यंत ३६ सामन्यांमध्ये ३७ गोल झळकावले आहेत. त्याने पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध झालेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत हॅट्ट्रिकची नोंद केली होती. बेन्झेमाने २१व्या, २४व्या आणि ४६व्या मिनिटाला गोल झळकावले. चेल्सीकडून एकमेव गोल काय हॅवर्ट्झने (४०व्या मि.) केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रेयालने आपले वर्चस्व प्रस्थापित करून चेल्सीला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

व्हिलारेयालचा विजय

व्हिलारेयालने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत सहा वेळा जेतेपद मिळवणाऱ्या बायर्न म्युनिकला १-० असे पराभूत करीत तब्बल १६ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या लढतीतील एकमेव गोल पहिल्या सत्रात आरनॉट डांजुमाने केला. चॅम्पियन्स लीगमधील गेल्या ३० सामन्यांमधील बायर्नचा हा केवळ दुसरा पराभव आहे.