UEFA चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील अंतिम सामना आर्सेनल आणि पीएसजी (पॅरिस सेंट जर्मन) या दोन्ही संघामध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शेवटी पेनल्टी शूट आऊटमध्ये पॅरिस सेंट जर्मनने आर्सेनलवर ४-३ ने दमदार विजय मिळवला होता. अंतिम शिटी वाजल्यानंतर पॅरिसमध्ये पॅरिस सेंट जर्मन संघाच्या विजयाच्या जल्लोषाला सुरुवात झाली. पण या जल्लोषाला हिंसक वळण लागलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली, की नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान पोलिस आणि चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. ज्यात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
पीएसजी संघासाठी हे फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठं जेतेपद ठरलं. त्यामुळे जल्लोष होणं साहजिक होतं. पण या जल्लोषाला गालबोट लागलं. हजारो चाहते जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर उतरले. यादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. इतकेच नव्हे, तर बस थांबे फोडण्यात आले आणि गाड्या जाळण्यात आल्या.
दरम्यान डॅक्स शहरात शनिवारी रात्री उशिरा छातीत चाकूने वार केल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्ताने दिली. यासह पॅरिसच्या मध्यवर्ती भागात स्कूटर चालवत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती सरकारी वकील कार्यालयाने दिली आहे.
पीएसजीकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. पीएसजीने हिंसाचाराचा निषेध करत आपल्या निवेदनात लिहिले की, “या घटना क्लबच्या मूल्यांच्या. विरुद्ध आहेत. त्या आमच्या बहुसंख्य समर्थकांचे कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाहीत.”
फ्रान्सच्या गृहमंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे झालेल्या संघर्षात १९२ जण जखमी झाले आहेत. तर ५५९ जणांना अटक करण्यात आली आहे. या संघर्षात पॅरिसमधील ४९१ जणांचा समावेश आहे. ऐतिहासिक विजयानंतर जोरदार जल्लोष होणार याची कल्पना असताना पॅरिसमधील ५४०० पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. फटाके बाळगण्याचा आणि गोंधळ घालण्याच्या संशयावरून ३०० जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती पॅरिस पोलिसांनी दिली आहे.
