आघाडीचे खेळाडू लिओनेल मेसी आणि किलियान एम्पाबे यांनी प्रत्येकी केलेल्या दोन गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेन संघाने युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात क्लब ब्रुजला ४-१ असे पराभूत केले. अ-गटातील दुसऱ्या सामन्यात आरबी लेपझिगने मँचेस्टर सिटीला २-१ असा पराभवाचा धक्का दिला.

पॅरिसने अखेरच्या साखळी लढतीत सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला. एम्पाबेने दुसऱ्या आणि सातव्या मिनिटाला गोल करत पॅरिसला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या दोन गोलसह त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. २२ वर्षे आणि ३५२ दिवस वय असलेला एम्बापे चॅम्पियन्स लीगमध्ये ३० गोल करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याला मेसीनेही (३८ आणि ७६वे मिनिट) दोन करत उत्तम साथ दिल्याने पॅरिसने सहा सामन्यांत तिसऱ्या विजयाची नोंद केली. मँचेस्टर सिटीचा पराभव झाला असला, तरी त्यांनी १२ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले.

अन्य लढतीत रेयाल माद्रिदने इंटर मिलानला २-० असे नमवले. टोनी क्रूस (१७वे मि.) आणि मार्को असेन्सियो (७९वे मि.) यांनी रेयालसाठी गोल केले.

अ‍ॅटलेटिको बाद फेरीत

चॅम्पियन्स लीगच्या ब-गटात लिव्हरपूलसह अ‍ॅटलेटिको माद्रिदने बाद फेरीत प्रवेश केला. अ‍ॅटलेटिको, पोर्टो आणि एसी मिलान यांच्यात आगेकूच करण्यासाठी स्पर्धा होती. अ‍ॅटलेटिकोने पोर्टोवर ३-१ असा विजय मिळवला, तर एसी मिलानला लिव्हरपूलने १-२ असे पराभूत केले. साखळी फेरीत सहा पैकी सहा सामने जिंकणारा लिव्हरपूल हा पहिला इंग्लिश संघ ठरला.