पॅरिस : कठीण प्रसंगी सर्वाधिक अनुभवी खेळाडू संघाला कशाप्रकारे सावरतो, हे लिओनेल मेसीने पुन्हा दाखवून दिले. चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील मंगळवारी झालेल्या सामन्यात मेसीने दुसऱ्या सत्रात सात मिनिटांच्या अंतराने केलेल्या दोन गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेनने पिछाडीवरून आर. बी. लेपझिग संघावर ३-२ अशी सरशी साधली.

‘अ’ गटातील या लढतीत किलियान एम्बापेने नवव्या मिनिटाला सेंट-जर्मेनसाठी पहिला गोल नोंदवला. मात्र आंद्रे सिल्व्हा (२८ मि.) आणि नॉर्डी म्युकेल (५७ मि.) यांनी लेपझिगला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ६७व्या मिनिटाला एम्बापेच्या पासला गोलजाळ्याची दिशा दाखवून मेसीने संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ७४व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे तिसरा गोल झळकावून त्याने सेंट-जर्मेनचा विजय सुनिश्चित केला.

सिटी, रेयालचे पंचतारांकित विजय

माद्रिद : बलाढ्य रेयाल माद्रिद आणि गतउपविजेता मँचेस्टर सिटी या संघांनी चॅम्पियन्स लीगमध्ये बुधवारी पंचतारांकित विजय साकारले. व्हिनिशियन जुनियरने केलेल्या दोन गोलमुळे रेयालने ‘ड’ गटातील सामन्यात शाख्तर डोनेत्स्कचा ५-० असा धुव्वा उडवला. तर रियाद माहरेझच्या दोन गोलला अन्य तीन गोलची साथ लाभल्यामुळे सिटीने क्लब ब्रजला ५-१ अशी धूळ चारली. याशिवाय मोहम्मद सलाहच्या चमकदार कामगिरीमुळे लिव्हरपूलने अ‍ॅटलेटिको माद्रिदवर ३-२ अशी मात केली. सलग तिसऱ्या विजयासह लिव्हरपूलने ‘ब’ गटात अग्रस्थान मिळवले.

३४ कारकीर्दीत एकूण ३४व्यांदा मेसीने चॅम्पियन्स लीगमधील एकाच सामन्यात किमान दोन गोल नोंदवण्याचा पराक्रम केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेसी (१२३) ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (१३७) दुसऱ्या क्रमांकावर आहे.