एपी, माद्रिद
गतविजेत्या चेल्सीविरुद्ध मंगळवारी दुसरा सामना गमावूनसुद्धा रेयाल माद्रिदने उपांत्यपूर्व फेरीत ५-४ अशा एकूण गोलफरकाने सरशी साधली आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
करिम बेन्झेमाच्या हॅटट्रिकमुळे उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात रेयालने ३-१ असा विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या लढतीत त्यांचा २-३ असा पराभव झाला. एकूण गोलसंख्येमध्ये रेयालने बाजी मारली. बेन्झेमाने (९६व्या मिनिटाला) अतिरिक्त वेळेत केलेला गोल निर्णायक ठरला. चॅम्पियन्स लीगच्या यंदाच्या हंगामातील हा त्याने १२वा गोल झळकावला. उपउपांत्यपूर्व फेरीत रेयाल माद्रिदने पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध ३-१ असा विजय मिळवला होता. यात दुसऱ्या सत्रातील बेन्झेमाच्या हॅटट्रिकचे महत्त्वाचे योगदान होते.
या सामन्यात चेल्सीकडून मेसन माऊंट (१५व्या मिनिटाला), अॅं टोनियो रुडीगर (५१वे मि.) आणि टिमो वेर्नेर (७५वे मि.) यांनी गोल झळकावले. रेयाल माद्रिदचा संघ सामन्यात ०-३ असा पिछाडीवर होता. पण, बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या रॉड्रिगोने (८०वे मि.) गोल करत एकूण गोलसंख्या ४-४ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे १२ वर्षांत १०व्यांदा उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात त्यांना यश मिळाले.
व्हिलारेयालची आगेकूच
व्हिलारेयालने मंगळवारी सहा वेळा युरोपियन विजेत्या बायर्न म्युनिकला पराभूत करत चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली. व्हिलारेयालने २००६ नंतर पहिल्यांदा हे यश मिळवले आहे. व्हिलारेयालने उपांत्यपूर्व फेरीतील दुसरी लढत १-१ अशी बरोबरीत राखली, तरीही २-१ अशा एकूण गोलफरकामुळे त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. कारण पहिल्या सामन्यात व्हिलारेयालने बायर्न म्युनिकला १-० असे पराभूत केले होते. व्हिलारेयालकडून ८८व्या मिनिटाला सॅम्युएल चुकवुएजेने गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. बायर्न म्युनिककडून रॉबर्ट लेवांडोवस्कीने ५२व्या मिनिटाला गोल मारत संघाला आघाडी मिळवून दिली. व्हिलारेयालने युरोपा लीग जिंकत चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवली होती, तर स्पॅनिश लीगमध्ये ते सातव्या स्थानी आहेत. बायर्न म्युनिकने २०२०चा युरोपीयन चषक जिंकला होता आणि बुंदेसलीगामध्ये ते अग्रस्थानी आहेत.