दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डी’व्हिलियर्स त्याच्या ३६० डिग्री फलंदाजीसाठी ओळखला जातो. नावीण्यपूर्ण फटके आणि कोणत्याही स्थितीत सामना एकहाती फिरवण्याची ताकद यामुळे डी’व्हिलियर्स दक्षिण आफिकेसाठी अनेकदा तारणहार ठरला आहे. मात्र चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना डी’व्हिलियर्स अपयशी ठरला. इमाद वासिमने डी’व्हिलियर्सला शून्यावर बाद केले. एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची डी’व्हिलियर्सची कारकिर्दीतील पहिलीच वेळ होती. याआधी डी’व्हिलियर्स कधीही पहिल्याच चेंडूवर चेंडूवर बाद झालेला नाही.

पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. डी’व्हिलियर्स बाद झाला, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती ३ बाद ६१ अशी होती. पाकिस्तानचा फिरकीपटू इमाद वासिमने १५ व्या षटकात डी’व्हिलियर्सला बाद केले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर डी’व्हिलियर्सला स्ट्राईक मिळाला होता. यावेळी इमादने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. डी’व्हिलियर्सने चेंडू कव्हरला फटकावला. मात्र चेंडू थेट मोहम्मद हफिझच्या हातात गेला. हाफिझने झेल टिपला आणि डी’व्हिलियर्स पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

डी’व्हिलियर्स आतापर्यंत २२१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यातील २१२ सामन्यांमध्ये डी’व्हिलियर्सला फलंदाजीची संधी मिळाली आहे. यातील एकाही सामन्यात डी’व्हिलियर्स पहिल्याच चेंडूवर बाद झाला नव्हता. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डी’व्हिलियर्सला ‘गोल्डन डक’ झाला. याआधी कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून डी’व्हिलियर्स सहा वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.

डी’व्हिलियर्स माघारी परतल्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्के दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ बाद १६५ असा अडचणीत सापडला होता. मात्र डेव्हिड मिलरने ७५ धावांची नाबाद खेळी करत संघाला २१९ धावांपर्यंत नेले. पाकिस्तानकडून हसन अलीने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर इमाद वासिम आणि जुनेद खानने प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला वेसण घातली.

श्रीलंकेवर सफाईदार विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकिट मिळवण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी या सामन्यात ढेपाळली. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पाकिस्तानसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. पाकिस्तानने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यात यश मिळवले.