आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक स्पर्धांची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. पुढील १० वर्षात जगभरामध्ये कुठे-कुठे आणि कोणत्या स्पर्धा भरवल्या जाणार याची माहिती आयसीसीने जाहीर केली. यामधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमध्येही क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र अनेक संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार की नाहीत यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. अनेकांचे लक्ष भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार का?, याकडे लागले आहे. दरम्यान, आयसीसीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान जगभरातील संघ क्रिकेट खेळण्यासाठी तेथे जातील की नाही यावर, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले  (Greg Barclay) म्हणाले, “होय, आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की सर्व संघ पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळतील.” ग्रेग बार्कले म्हणाले की, “मला आशा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध क्रिकेटच्या माध्यमातून सुधारू शकतात.”

यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना  ग्रेग बार्कले म्हणाले, “आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काय घडले याने काही फरक पडत नाही. जर आम्हाला पाकिस्तानमध्ये आयसीसी कार्यक्रम आयोजित करण्याचा आत्मविश्वास नसता तर आम्ही ते केले नसते. पाकिस्तानला बऱ्याच काळानंतर ही एक संधी असेल” असे ते म्हणाले.

 भारतातील दहशतवादी हल्ल्यांनंतरच्या राजकीय तणावामुळे २०१२ पासून दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट खेळलेले नसल्यामुळे या स्पर्धेत भारताच्या सहभागावर शंका असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेवटच्या वेळी १९९६ चा विश्वचषक भारत आणि श्रीलंका एकत्र पाकिस्तानात झाला होता. २००९ नंतर पाकिस्तानमध्ये फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले नाहीत, कारण २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर जगभरातील देशांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.