scorecardresearch

घरच्या मैदानावर भारताची कसोटी

प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचा तडकाफडकी राजीनामा.. जगातील अव्वल संघांचा समावेश.. या मोसमातील अप्रतिम कामगिरी..

घरच्या मैदानावर भारताची कसोटी

प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचा तडकाफडकी राजीनामा.. जगातील अव्वल संघांचा समावेश.. या मोसमातील अप्रतिम कामगिरी.. अशा परिस्थितीत घरच्या वातावरणात चांगल्या कामगिरीची आशा भारतीय हॉकी संघाने बाळगली आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर शनिवारपासून चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे बिगूल वाजणार असून भारताला सलामीलाच ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीशी दोन हात करावे लागणार आहेत.
जागतिक स्पर्धेतील सुमार कामगिरी वगळता, भारतीय संघाने वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्यानंतर आशियाई स्पर्धेत १६ वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकून भारताने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची करामत भारताने केली. मात्र चॅम्पियन्स स्पर्धेत भारताला ‘ब’ गटात जर्मनीसह जागतिक रौप्यपदक विजेत्या नेदरलॅण्ड्स आणि जागतिक कांस्यपदक विजेत्या अर्जेटिनाशी झुंज द्यावी लागणार आहे. ‘अ’ गटात जागतिक विजेता ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पाकिस्तान आणि इंग्लंडचा समावेश आहे. भारताने याआधी चॅम्पियन्स स्पर्धेत फक्त १९८२ मध्ये कांस्यपदक पटकावले होते.
वॉल्श यांच्या राजीनाम्याचा भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार असला तरी सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मधल्या फळीत सरदारा तर बिरेंद्र लाकरा, व्ही. आर. रघुनाथ, रुपिंदरपाल सिंग आणि गुरबाज सिंग यांच्यावर बचावफळीची भिस्त आहे. रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, निकिन थिमय्या आणि ललित उपाध्याय ही आघाडीची फळी भारताकडे आहे. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सुरेख कामगिरी केली असून त्याच्याकडून अशाच कामगिरीची आशा भारताला आहे.

परदेशी संघांना उष्ण वातावरणाची चिंता
हिवाळा सुरू झाला असला तरी दिवसातील उष्ण वातावरणाचा फटका चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनिमित्त आलेल्या युरोपियन संघांना बसणार आहे. जर्मनीचा कर्णधार मॉरित्झ फस्र्टे तसेच इंग्लंडचा कर्णधार बॅरी मिडल्टन यांनी भुवनेश्वरमधील उष्ण वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. रात्री कडाक्याची थंडी जाणवत असली तरी दिवसा ३० ते ३२ अंश सेल्सियस इतके वातावरण असते. ‘‘सकाळी होणाऱ्या सामन्यात परदेशी संघांची कसोटी लागणार आहे. आम्ही येथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत,’’ असे फस्र्टे याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2014 at 06:30 IST

संबंधित बातम्या