स्पॅनिश फुटबॉल लीग

लिओनेल मेसी याने पहिला गोल झळकावल्यानंतरही सात मिनिटांच्या अंतराने तीन गोल स्वीकारल्यामुळे बलाढय़ बार्सिलोनाला लेव्हांटेकडून १-३ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बार्सिलोना २२ गुणांसह अग्रस्थानी असला तरी त्यांना मागे टाकण्याची संधी रेयाल माद्रिदकडे आहे.

मेसीने ३८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीद्वारे बार्सिलोनाचे खाते खोलले. मेसीचा हा पाच सामन्यांतील सहावा गोल ठरला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात लेव्हांटेने दमदार पुनरागमन केले. ६१व्या मिनिटाला जोस कॅम्पानाच्या गोलमुळे लेव्हांटेने गोलची परतफेड केल्यानंतर दोन मिनिटांनी बोर्जा मायोरालने गोल करत लेव्हांटेला २-१ असे आघाडीवर आणले. त्यानंतर ६८व्या मिनिटाला नेमांजा राडोजा याच्या गोलमुळे लेव्हांटेने विजय साजरा केला. या विजयामुळे लेव्हांटेने आठव्या स्थानी मजल मारली आहे.

‘‘सर्व काही सुरळीत झालेच नाही. दुसऱ्या सत्रातही आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही. त्याचबरोबर गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यातही आम्ही अपयशी ठरलो. लेव्हांटेचाही खेळ चांगला होत नव्हता, मात्र अचानक त्यांनी दोन गोल केले. तिसऱ्या गोलमुळे मात्र आमचा पराभव निश्चित झाला,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वाल्वेर्डे यांनी सांगितले.

बार्सिलोनाच्या पराभवामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदला अग्रस्थानी मजल मारण्याची संधी होती. पण सेव्हिलाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवल्यामुळे त्यांना २१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. फ्रांको वाकेझ याने २८व्या मिनिटाला सेव्हिलाला आघाडीवर आणल्यानंतर अल्वारो मोराटा याने गोल करत अ‍ॅटलेटिको माद्रिदला बरोबरी साधून दिली.

युव्हेंटस अव्वल स्थानी

मॅथिस डे लाइट याने केलेल्या एकमेव गोलमुळे युव्हेंटसने टोरिनोचा १-० असा पराभव करून सेरी-ए फुटबॉल लीगमध्ये २९ गुणांसह अग्रस्थान पटकावले. रोमेलु लुकाकू याने दोन गोल करत इंटर मिलानला बोलोग्नावर २-१ असा विजय मिळवून दिला. तरीही इंटर मिलानला २८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या सामन्यात, रोमा संघाने नापोलाचा २-१ असा पाडाव केला. निकोलो झानिआलो (१९व्या मिनिटाला) आणि जॉर्डन वेरेटोट (५५व्या मिनिटाला) यांनी सुरुवातीलाच रोमा संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. नापोलीच्या अर्कादिझ मिलिक याने ७२व्या मिनिटाला गोल करून पिछाडी कमी केली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेरच्या क्षणाला रोमाच्या यिल्डिरिम सेटिनला पंचांनी लाल कार्ड दाखवत बाहेर पाठवले.