scorecardresearch

प्रीमियर लीग फुटबॉल : हॅवर्ट्झमुळे चेल्सीची विजयी घोडदौड

८९व्या मिनिटाला जॉर्जिन्होच्या पासवर हॅवर्ट्झने गोल करत चेल्सीला १-० असा विजय मिळवून दिला.

लंडन : काय हॅवर्ट्झने अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात न्यूकॅसलवर १-० अशी मात केली.

प्रीमियर लीगच्या कार्यकारी मंडळाने रशियन उद्योजक रोमन अब्रामोव्हिच यांना चेल्सीचे मालक म्हणून अपात्र ठरवले. त्यानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळताना चेल्सीच्या संघाने झुंजार खेळ केला. त्यांनी न्यूकॅसलला नमवत आपली विजयी घोडदौड कायम राखली. हा त्यांचा प्रीमियर लीगमधील सलग पाचवा विजय ठरला.

या सामन्यात दोन्ही संघांना आक्रमणात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. आंद्रेस ख्रिस्टिन्सन, हॅवर्ट्झ आणि रोमेलू लुकाकू या चेल्सीच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना याचा फायदा घेता आला नाही. अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ८९व्या मिनिटाला जॉर्जिन्होच्या पासवर हॅवर्ट्झने गोल करत चेल्सीला १-० असा विजय मिळवून दिला.

अन्य लढतींत वेस्ट हॅमने अ‍ॅश्टन व्हिलाला, वॉटफर्डने साउदम्टनला, तर लीड्स युनायटेडने नॉर्विच सिटीला प्रत्येकी २-१ असे पराभूत केले. तसेच आर्सनलने लिस्टर सिटीला २-० असे नमवले.

लीग-१ फुटबॉल : सेंट-जर्मेनची बोडरेवर मात

पॅरिस : पॅरिस सेंट-जर्मेन संघाने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात बोडरेवर ३-० अशी मात केली. मागील आठवडय़ात सेंट-जर्मेनचे चॅम्पियन्स लीगमधील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे निराश चाहत्यांनी बोडरेविरुद्धच्या सामन्यात लिओनेल मेसी आणि नेयमार यांसारख्या सेंट-जर्मेनच्या प्रमुख खेळाडूंना विरोध दर्शवला. मात्र त्यानंतरही किलियन एम्बापे (२४वे मिनिट), नेयमार (५२वे मि.) आणि लिआंन्ड्रो पेरेडेस (६१वे मि.) यांच्या गोलमुळे सेंट-जर्मेनला हा सामना जिंकण्यात यश आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chelsea beat newcastle in premier league football match zws

ताज्या बातम्या