जॉन टेरी आणि सेस्क फॅब्रेगस यांच्या गोलमुळे बलाढय़ चेल्सीने स्टोक सिटीचा २-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. या विजयामुळे चेल्सी संघाचा नाताळाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
ज्या मैदानावर अर्सेनलला स्टोक सिटीकडून ३-२ असे पराभूत व्हावे लागले होते, त्याच मैदानावर प्रशिक्षक जोस मॉरिन्होच्या मार्गदर्शनाखालील चेल्सीने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत विजय साकारला. शनिवारी मँचेस्टर सिटीने विजय मिळवून चेल्सीइतकेच गुण मिळवले होते. मात्र या विजयामुळे चेल्सीने मँचेस्टर सिटीला तीन गुणांच्या फरकाने मागे टाकून अव्वल स्थान काबीज केले आहे. मात्र बेल्जियमच्या इडेन हझार्डला झालेल्या दुखापतीमुळे चेल्सीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दुसऱ्याच मिनिटाला जॉन टेरीने फॅब्रेगसच्या पासवर गोल करून चेल्सीचे खाते खोलले. इंग्लंडचा माजी कर्णधार असलेल्या जॉन टेरीचा हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील या मोसमातील हा पहिला गोल ठरला. अध्र्या तासाच्या आत चेल्सीला आघाडी २-० अशी वाढवता आली असती. फॅब्रेगसने दिलेला पास स्टोक सिटीच्या बचावपटूंना भेदून पुढे गेला. धावत येऊन दिएगो कोस्टाने चेंडूवर नियंत्रण मिळवले, पण त्याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाजूने गेला. सामना संपायला १२ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना हझार्डच्या पासवर फॅब्रेगसने चेंडूवर ताबा मिळवला. त्यानंतर गोलजाळ्याच्या जवळून मारलेला फटका स्टोक सिटीचा गोलरक्षक अस्मिर बेगोव्हिकला चकवून जाळ्यात गेला. चेल्सीला ही आघाडी ३-० अशी वाढवता आली असती. पण आंद्रे शुर्लेच्या पासवर कोस्टाने मारलेला फटका बेगोव्हिकने परतवून लावला.