राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्राने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले, तर मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात चेंबूर क्रीडा केंद्राने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचा अतिशय रोमहर्षक लढतीत ३२-२९ असा पराभव केला. चेंबूरने पहिल्या पाच मिनिटांतच लोण चढवल्यानंतर मध्यंतराला १५-१० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी संघाच्या शुभम शिर्केने एकाच चढाईत चार गुण मिळवत लोणची परतफेड केली आणि संघाला आघाडी मिळवून दिली. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना छत्रपती शिवाजी संघाकडे २४-२३ अशी एका गुणाची आघाडी होती. परंतु चेंबूरने सामन्यावरील नियंत्रण गमावले नाही.
महिला गटातील अंतिम सामन्यात शिवशक्तीने मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळावर ३६-२८ अशी मात केली. या सामन्यात मध्यंतराला शिवशक्तीकडे १८-१४ अशी ४ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र शिवशक्तीच्या ज्योती डफळेने बोनस गुण मिळवत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला प्रतीक्षा तांडेलने सुंदर साथ दिली. संघर्षच्या कोमल देवकर व प्रणाली नागदेवते यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पुरुष गटात आकाश कदम (चेंबूर) आणि महिला गटात ज्योती डफळे (शिवशक्ती) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू शुभम शिर्के (छत्रपती शिवाजी) आणि पूजा जाधव (संघर्ष) ठरले. तसेच सर्वोत्तम पकडपटूचे पुरस्कार गुफरान शेख (चेंबूर) आणि प्रणाली नागदेवते (संघर्ष) यांनी पटकावले.