अबू धाबी : कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा चेन्नईवासी वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीचा रविवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत चेन्नई सुपर किंग्जने धसका घेतला आहे.

‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात दोन दिमाखदार विजयांसह प्रारंभ करणारे हे दोन्ही संघ विजयी घोडदौड राखण्याचा प्रयत्न करतील. अतिउसळणारे आणि अनपेक्षित वळणारे चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या वरुणने अमिरातीमधील मागील हंगामात चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. पण चेन्नईच्या फलंदाजांची मदार असलेले ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी वरुणचे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करतील. ऋतुराजने मुंबईविरुद्ध नाबाद ८८ आणि बेंगळूरुविरुद्ध ३८ धावांची खेळी साकारली होती.

दुसरीकडे, कोलकाताची भिस्त धडाकेबाज फलंदाज वेंकटेश अय्यरवर असेल. त्याने बेंगळूरुविरुद्ध ४१ आणि मुंबईविरुद्ध ५३ धावांची खेळी साकारून लक्ष वेधले आहे. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी हेसुद्धा सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. चेन्नईच्या खात्यावर ९ सामन्यांतील ७ विजयांसह १४ गुण जमा आहेत, तर कोलकाताने ९ सामन्यांत ४ विजयांनिशी ८ गुण कमावले आहेत. त्यामुळे चेन्नईचे पारडे जड मानले जात आहे.

’ सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)