Mumbai Indians vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सचा गड समजला जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत करणं मुळीच सोपं नव्हतं. पण याच मैदानावर आता मुंबईला एका पाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागत आहे. चेन्नईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळताना मुंबईचा रेकॉर्ड दमदार होता. पण या सामन्यात मुंबईला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. संजू सॅमसनच्या १०१ धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने २०७ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा बचाव करताना नूर अहमद आणि अकिल हुसेन यांनी मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. मुंबईला हा सामना १०३ धावांनी गमवावा लागला आहे.
रोहित – धोनी बाहेर
या सामन्यात एमएस धोनी आणि रोहित शर्मा खेळणार असल्याची चर्चा होती. या सामन्याआधी एमएस धोनी वानखेडे स्टेडियमवर सराव करताना दिसून आला होता. पण या सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. तर रोहित शर्मा देखील खेळणारा असल्याचं म्हटलं जात होतं. पण तो देखील पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरला.
संजू सॅमसनचं शतक
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून संजू सॅमसनने नाबाद १०१ धावांची दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार खेचले. तर ऋतुराज गायकवाडने २२, सर्फराज खानने १४, शिवम दुबेने ५, डेवाल्ड ब्रेव्हिस २१, कार्तिक शर्माने १८, जेमी ओव्हरटनने १५ तर अकिल हुसेनने २ धावा केल्या. यासह चेन्नईने २० षटकांअखेर ६ गडी बाद २०७ धावा केल्या.
मुंबईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो
मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी २०८ धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण कुठलाच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. क्विंटन डीकॉक अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. तर दानिश मालेवार आणि नमन धीर हे दोघेही शून्यावर माघारी परतले. सूर्यकुमार यादवने ३६, तिलक वर्माने ३७, हार्दिक पांड्या १ धाव करून माघारी परतला. रुदरफोर्डकडून मोठया खेळीची अपेक्षा होती. पण तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला.
वानखेडेवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला
या सामन्यात धावांचा बचाव करताना चेन्नई सुपर किंग्ज संघातील फिरकी गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. नूर अहमद आणि अकिल हुसेन या फिरकी गोलंदाजांनी मिळून ८ षटकात अवघ्या ४४ धावा खर्च केल्या आणि ६ गडी बाद केले. अकिल हुसेनने ४ षटकात १ निर्धाव षटक टाकत १७ धावा खर्च केल्या आणि ४ गडी बाद केले. तर तर नूर अहमदने २४ धावा खर्च करून २ गडी बाद केले.
गुणतालिकेत चेन्नईची झेप
या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या सामन्याआधी चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी होता, तर चेन्नईचा संघ सातव्या स्थानी होता. आता चेन्नईचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ आठव्या स्थानी पोहोचला आहे.
