CSK New Head Coach Official Announcement: आयपीएलमधील ५ वेळचा चॅम्पियन संघ आणि कॅप्टन कुल एम एस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघाला नवा कोच मिळाला आहे. आयपीएल २०२४ नंतर अनेक वर्षे एकत्र काम केल्यानंतर स्टीफन फ्लेमिंग आणि सीएसके यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सीएसके व स्टीफन फ्लेमिंग यांच तब्बल १८ वर्षांची साथ सुटली. यानंतर चेन्नई संघाचा नवा कोच असणार, याची सर्वांनाच प्रतिक्षा होती, आता अखेरीस चेन्नई सुपर किंग्स संघाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नव्या कोचची घोषणा केली आहे. भारताच्या माजी खेळाडूच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाने अखेरीस नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान चेन्नई सुपर किंग्सचा नवा हेड कोच असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली. CSKमध्ये येण्यापूर्वी झहीरने २०२५च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून काम केलं होतं. मात्र, एका हंगामानंतर त्याने हे पद सोडलं. ४८ वर्षांचा होणाऱ्या झहीरने भारतासाठी ९२ कसोटी, २०० वनडे आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. २०११च्या ऐतिहासिक वनडे विश्वचषक विजयाच्या मोहिमेत तो २१ विकेट्ससह भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
CSK सलग तिसऱ्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर फ्रँचायझीने २००९पासून मुख्य प्रशिक्षक असलेल्या फ्लेमिंगसोबतचा करार संपवला. फ्लेमिंगनंतर CSKचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं होतं की, नव्या प्रशिक्षकाच्या शोधाची जबाबदारी फ्रँचायझीने महेंद्रसिंह धोनीवर सोपवली होती.
स्टीफन फ्लेमिंगनंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू असताना सुरुवातीपासूनच विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनीने भारतीय प्रशिक्षकाला जबाबदारी देण्याची जोरदार बाजू मांडली.
फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली CSKला सातत्याने यश मिळालं होतं. याशिवाय IPLमधील इतर काही फ्रँचायझींनाही विदेशी प्रशिक्षकांकडून चांगले निकाल मिळाल्यामुळे CSKमध्येही विदेशी प्रशिक्षक नेमण्याच्या बाजूने मत होतं. मात्र, IPLचा विशेष अनुभव असलेल्या विदेशी प्रशिक्षकांचे पर्याय मर्यादित होते, त्यामुळे अखेरीस भारतीय प्रशिक्षकाच्या पर्यायाकडे गांभीर्याने पाहण्यात आलं.
