Delhi Capitals vs Chennai Super Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला ७ गडी बाद १५५ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ८७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने ८ गडी राखून आणि १५ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.
चेन्नई सुपर किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १५६ धावा करायच्या होत्या. चेन्नईचा सध्याचा फॉर्म पाहता ही धावसंख्या फार मोठी नव्हती. पण धावांचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. ऋतुराज गायकवाड अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. त्यानंतर उर्विल पटेलने संजू सॅमसनसोबत मिळून हातभार लावला. पण उर्विल पटेल १७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शेवटी संजू सॅमसन आणि कार्तिक शर्माने मिळून शतकी भागीदारी केली. यादरम्यान संजू सॅमसन ५२ चेंडूंचा सामना करून ८७ धावांवर नाबाद राहिला. तर कार्तिक शर्माने ३१ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नईने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
दिल्लीने केल्या १५५ धावा
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय फसला, कारण दिल्लीला हवी तितकी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीला आलेला पथूम निसांका १९ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुलने अवघ्या १२ धावा केल्या. नितीश राणा अवघ्या १५ धावांवर माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला करुण नायर अवघ्या १३ धावा करून माघारी परतला. कर्णधार अक्षर पटेल अवघ्या २ धावांवर बाद झाला. शेवटी ट्रिस्टन स्टब्सने ३८ धावांची खेळी केली. तर समीर रिझवी ४० धावांवर नाबाद राहिला. या खेळीच्या बळावर दिल्लीने १५५ धावांपर्यंत मजल मारली.
या विजयानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी कायम आहे. चेन्नईने आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर ५ सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ सध्या १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानी आहे.
