चेन्नई सुपर किंग्सने दोन अष्टपैलू खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादबरोबर झालेल्या ट्रेडऑफमध्ये लायम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स यांना संघात घेतलं आहे. या दोघांच्या बदल्यात खलील अहमद आणि नॅथन एलिस सनरायझर्स हैदराबादकडे जातील.

आयपीएल ऑक्शनमध्ये हैदराबादने तब्बल १३ कोटी रुपये खर्चून लिव्हिंगस्टोनला ताफ्यात घेतलं होतं. मात्र अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात. ही अट असल्यामुळे लिव्हिंगस्टोनला खेळण्याची फारशी संधीच मिळाली नाही.चेन्नईसाठी लिव्हिंगस्टोन हुकूमी एक्का होऊ शकतो. चेन्नईच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर लिव्हिंगस्टोनची फिरकी उपयुक्त आहे. फिनिशर म्हणून लिव्हिंगस्टोनने आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. लिव्हिंगस्टोन अफलातून क्षेत्ररक्षक आहे. रवींद्र जडेजाला ट्रेडऑफ केल्यानंतर चेन्नईला चांगल्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती. लिव्हिंगस्टोन चेन्नईसाठी चपखल आहे.

जॅक एडवर्ड्स हाही अष्टपैलू खेळाडू असून, गेल्या हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. दरम्यान या दोघांना घेण्यासाठी चेन्नईने नॅथन एलिससारख्या गुणी गोलंदाजाला सोडलं आहे. हाणामारीच्या षटकात गोलंदाजीसाठी चेन्नईने एलिसला घेतलं होतं. मात्र दुखापतीमुळे गेल्या हंगामात एलिस खेळूच शकला नाही. खलील गेल्या हंगामात पाच सामने खेळला. दुखापतीमुळे त्याचा हंगाम तिथेच संपला.