Chennai Super Kings Opening Pair: आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ सज्ज झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू चेपॉकच्या मैदानावर कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे धोनीला संघाचं नेतृत्व करावं लागलं होतं. पण यावेळी ऋतुराज गायकवाड पूर्णपणे फिट असून आगामी हंगामासाठी तयार आहे. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. पण यावेळी चेन्नईकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी कोणती जोडी डावाची सुरूवात करणार, याबाबत अपडेट दिली आहे.
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे अनुभवी खेळाडूंची फौज होती. पण आता युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल राखणारा कुठला संघ असेल, तर तो चेन्नई सुपर किंग्जचा संघ आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणारा संजू सॅमसन आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या ट्रेडनुसार, संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जमध्ये प्रवेश केला. तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी २५ मार्चला ‘कॅप्टन्स डे’ चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जची सलामी जोडी कशी असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ऋतुराज म्हणाला, “मी स्वत: संजूसोबत डावाची सुरूवात करणार आहे.” आधी संजू आणि आयुष म्हात्रे सलामीला येऊ शकतात, अशी चर्चा रंगली होती. पण आता ऋतुराज गायकवाडने सलामीला कोण येणार, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. गेल्या हंगामात आयुषला डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली होती. पण अंडर-१९ संघाकडून खेळताना तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आहे.
चेन्नईचा पहिला सामना कधी?
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना ३० मार्चला बारसापरा क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. संजू सॅमसन पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तो कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
