Chennai Super Kings Playing 11 Prediction: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २८ मार्चला खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध होणार आहे. तर ५ वेळचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आपला पहिला सामना ३० मार्चला राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.
डावाची सुरूवात कोण करणार?
चेन्नई सुपर किंग्ज संघ यावेळी नव्या सलामी जोडीसह मैदानात उतरू शकतो. आगामी हंगामाआधी संजू सॅमसनचा चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश करण्यात आला आहे. संजूने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारताला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. तो यावेळी चेन्नईसाठी डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. तर भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आयुष म्हात्रे संजूसोबत मिळून डावाची सुरूवात करताना दिसू शकतो.
मधल्या फळीत कोण येणार?
चेन्नईच्या मधल्या फळीतही स्फोटक फलंदाज आहेत. ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. तर स्फोटक फलंदाज शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी डेवाल्ड ब्रेव्हिस फलंदाजीला येऊ शकतो. तर युवा फलंदाज कार्तिक शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. एमएस धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. पण यावेळी ही प्रतीक्षा आणखी लांबली जाऊ शकते. कारण धोनी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. धोनी नेहमीच शेवटी फलंदाजीला येतो आणि मोठे फटके मारून धावसंख्येत भर घालतो. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर आठव्या क्रमांकावर प्रशांत वीरला संधी दिली जाऊ शकते.
गोलंदाजीत अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतात फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे चेन्नईला नूर अहमदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आणि खलिल अहमद यांच्यावर वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असणार आहे.
