Chennai Super Kings Playoffs Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ सर्व सामने एमएस धोनीशिवाय खेळताना दिसून आला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला या हंगामात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. त्यानंतर दुखापतीमुळे एका पाठोपाठ एक स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले. तरीदेखील चेन्नईची गाडी रुळावर परतली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यापैकी ५ सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकवेळ चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडायच्या वाटेवर होता, पण आता या संघाकडे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर चेन्नईसाठी प्लेऑफचं समीकरण कसं आहे? जाणून घ्या.

आयपीएल २०२६ स्पर्धेतील १० सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ५ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. +०.१५१ नेट रनरेटसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. गुणतालिकेत सहाव्या स्थानी असूनही चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

कसं आहे समीकरण?

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये १० गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला टॉप ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी १६ गुणांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. त्यामुळे १६ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी चेन्नईला उर्वरित ४ पैकी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. जर चेन्नईने ४ पैकी ४ सामने जिंकले तर, चेन्नई प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार हे जवळजवळ निश्चित आहे. पण ३ सामने जिंकूनही चेन्नईकडे प्लेऑफ गाठण्याची संधी आहे.

चेन्नईचा दमदार विजय

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला १५५ धावा करता आल्या. दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक ४०, तर ट्रिस्टन स्टब्सने ३८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईकडून संजू सॅमसनने नाबाद ८७ धावांची खेळी केली. तर कार्तिक शर्माने ४१ धावा केल्या. चेन्नईने हा सामना ८ गडी राखून जिंकला.