आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. सध्या रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता ऋतुराजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टच्या कॅप्शनने आणि फोटोमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…
ऋतुराजने नुकतंच भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा बसली आहे.
ऋतुराजने या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी खरंच देवाचा आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने दिले आहे. ऋतुराजची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर
ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान ऋतुराजने हा फोटो पोस्ट केल्यावर अनेक क्रिकेटपटूंसह त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ऋतुराजला त्याच्या लग्नापूर्वीच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.