स्टीफन फ्लेमिंग यांच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचे दोन शिलेदार इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची सूची आणि सपोर्ट स्टाफ यांची घोषणा केली. स्टीफन फ्लेमिंग हे इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. १७ वर्ष ते चेन्नई सुपर किंग्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी होते. त्यांच्या बरोबरीने जेम्स फोस्टर आणि एरिक सिमन्स यांनीही चेन्नईला रामराम केला आहे. सिमन्स हे आठ वर्ष चेन्नईच्या ताफ्यात होते. फोस्टर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. या तिघांच्या बरोबरीने मार्कस ट्रेस्कॉथिक आणि रिचर्ड डॉसन इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कोचिंग टीमचा भाग असतील.

ब्रेंडन मॅक्युलम वनडे आणि टी२० संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. जीतन पटेल, टीम साऊदी, सारा टेलर आणि केव्हिन पीटरसन हे मॅक्युलम यांचे सहकारी असतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी यासंदर्भात घोषणा केली. माईक यार्डी नॅशनल बॅटिंग लीड तर रिचर्ड डॉसन नॅशनल स्पिन लीड तर ट्रॉय कूले फास्ट बॉलिंग लीड असतील.

चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीही संघाची साथ सोडणार असल्याचं वृत्त क्रिकइन्फो संकेतस्थळाने दिलं आहे. हसी इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफचा भाग होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण हसीने हे वृत्त फेटाळलं.