अष्टपैलू हार्दिक पंड्या हे आयपीएल बाजारातलं चलनी नाणं आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला ताफ्यात आणण्यासाठी चेन्नई २० कोटींची वेस ओलांडू शकतं अशी चर्चा आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, कॅप्टन्सी अशा सगळ्या आघाड्या सांभाळण्याचा अनुभव हार्दिककडे आहे. पाच जेतेपदं पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा हार्दिक अविभाज्य भाग होता. त्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपदावर नाव कोरलं. दुसऱ्या हंगामात गुजरातने फायनल गाठली. विक्रमी डीलसह हार्दिक मुंबई इंडियन्स संघात परतला. रोहित शर्माऐवजी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. मात्र कर्णधार आणि खेळाडू म्हणून दोन्ही आघाड्यांवर तो अपयशी ठरताना दिसत आहे. म्हणूनच यंदाचा हंगाम संपताच हार्दिकला ट्रेड करण्यात येणार अशा चर्चा सुरू झाल्या. आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात चर्चित आणि कोटीच्या कोटी उड्डाणं असलेला ट्रेड ठरू शकतो.

मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केल्यास चेन्नईची फिनिशर कोण याची चिंता मिटू शकते. त्याचा अनुभव सर्वतोपरी कामी येऊ शकतो. महेंद्रसिंग धोनी आता चेन्नईचा कर्णधार नसला तरी आजही त्याचा शब्द प्रमाण मानला जातो. हार्दिक आणि धोनी अतिशय जिवलग मित्र आहेत. हार्दिकची उपयुक्तता चेन्नईच्या संघाला सर्वसमावेशक करू शकते. डॅडीज आर्मी म्हणून ओळखला जाणाऱ्या चेन्नईने काही वर्षांपूर्वी युवा खेळाडूंच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यामुळे अतिशय अनुनभवी आणि चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेले खेळाडू असे दोन तट निर्माण झाले. या दोन वर्गांना सांधू शकण्याचं काम हार्दिक करू शकेल.

दरम्यान मुंबई इंडियन्सने हार्दिक रिलीज केल्यास, त्याच्या बदल्यात चेन्नई कोणाला देणार यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा संघ मुंबईकर युवा धडाकेबाज फलंदाज आयुष म्हात्रेसाठी उत्सुक आहेत. मात्र चेन्नई यासाठी तयार नाही. हार्दिक संघात आल्यास शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या दोघांना रिलीज करण्याची तयारी चेन्नईने दर्शवल्याचं समजतं आहे. मुंबई इंडियन्स तसंच चेन्नई सुपर किंग्स यांनी यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही पण पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याचं समजतं.

मधल्या फळीत तसंच फिनिशर म्हणून हार्दिकने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नवा चेंडू हाताळणे तसंच हाणामारीच्या षटकातही तो गोलंदाजी करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आयपीएल स्पर्धेचा, टी२० प्रकाराचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. जेतेपद पटकावण्यााठी काय करावं लागतं याची जाण आहे. मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी कशी उंचवावी हे त्याने अनेकदा दाखवून दिलं आहे. त्यामुळे हार्दिकसाठी तिजोरी रिती करण्यासाठी कोणताही संघ तयार होऊ शकतो.

४४वर्षीय धोनी यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता मात्र दुखापतीमुळे तो एकाही लढतीत खेळू शकला नाही. वय पाहता धोनी यापुढे खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. चेन्नईने नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. गेल्या वर्षाच्या हंगामानंतर चेन्नईने विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला ताफ्यात सामील केलं. सॅमसन हा धोनीचा वारसदार अशी कामगिरी त्याने केली. हार्दिकचाही समावेश झाल्यास चेन्नईच्या संघाला प्रचंड बळकटी मिळू शकते. मात्र हार्दिकला कारकिर्दीत दुखापतींनी सातत्याने ग्रासलं आहे. सततच्या दुखापतींमुळे हार्दिकने नॅशनल क्रिकेट अकादमी अर्थात सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब सुकर व्हावं यासाठी बंगळुरूला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सकडून हार्दिकला .. एवढं मानधन मिळतं. चेन्नईचा संघ त्याच्यापेक्षा जास्त मानधनाच्या ऑफरसह डील करू शकतं. मात्र त्याच्या बदल्यात त्यांना दोन महत्त्वाच्या खेळाडूंना सोडावं लागेल. शिवम दुबे गेली अनेक वर्ष चेन्नईचा हुकूमी एक्का आहे. युवा ब्रेव्हिस अनेक वर्ष चेन्नईकडून खेळू शकतो. मात्र हार्दिक हवा असल्यास चेन्नईला तडजोड करावी लागेल. संजू सॅमसनला ताफ्यात घेण्यासाठी चेन्नईने अनुभवी रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना सोडलं होतं. सॅमसनचं डील चेन्नईसाठी अत्यंत फायदेशीर ठरलं आहे.

U19 संघाकडून खेळताना दिमाखदार कामगिरी करणाऱ्या आयुषला चेन्नईने संघात घेतलं. ३० लाख रुपये एवढं त्याचं मानधन आहे. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ब्रेव्हिसचं मानधन २.२० कोटी रुपये मानधन आहे. अष्टपैलू शिवम दुबेचं मानधन १२ कोटी रुपये आहे. दुसरीकडे हार्दिकला मुंबईकडून १६.३५ कोटी रुपये मानधन मिळतं.