चेन्नईचा चमत्कार!

चेन्नई सुपर किंग्जच्या अनुभवी शिलेदारांनी चौथ्यांदा जेतेपदावर कब्जा मिळवून टीकाकारांची तोंडे बंद केली.

ऋषिकेश बामणे

करोना साथीचे गालबोट लागूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाचा प्रयोग यशस्वी ठरला. मर्यादित प्रेक्षकांच्या साक्षीने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या ‘आयपीएल’मधील बहुतांशी सामने नीरस झाले. दोन टप्प्यात रंगलेल्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या अनुभवी शिलेदारांनी चौथ्यांदा जेतेपदावर कब्जा मिळवून टीकाकारांची तोंडे बंद केली.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईला गतवर्षी बाद फेरीही गाठता आली नव्हती. युवा खेळाडूंवर भरवसा न दर्शवता अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या तिशीपल्याडच्या क्रिकेटपटूंनाच सातत्याने संधी दिल्यामुळे चेन्नईची अवस्था बिकट झाल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. धोनीने ‘आयपीएल’मधूनही निवृत्ती पत्करून अन्य खेळाडूंकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असेही टोले काहींनी लगावले. मात्र धोनीसह चेन्नईने हार मानली नाही.

रॉबिन उथप्पा, मोईन अली, चेतेश्वर पुजारा यांचा संघात समावेश केल्यामुळे पुन्हा चेन्नईला अपयशाला सामोरे जावे लागणार, असे वाटू लागले. मात्र पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या रूपात चेन्नईला हिरा गवसला. सर्वाधिक ६३५ धावांसह ऋतुराजने संपूर्ण हंगामात चेन्नईच्या फलंदाजीला तारले. याशिवाय शार्दूल ठाकूर, दीपक चहर या नव्या दमाच्या खेळाडूंनी गोलंदाजीत चमक दाखवली. धोनीनेसुद्धा स्पर्धेच्या अखेरीस छाप पाडली, तर फॅफ डय़ूप्लेसिस, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, उथप्पा यांनी मोक्याच्या क्षणी अनुभव काय कमाल करू शकतो, हे सिद्ध केले. त्यामुळे अंतिम फेरीत कोलकाताला नमवल्यावर चेन्नईच्या खेळाडूंचा जल्लोष तसेच धोनीने पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान व्यक्त केलेले मनोगत त्याच्या पाठीराख्यांना भावुक करणारा ठरला.

४० वर्षीय धोनीची ही अखेरची ‘आयपीएल’ असू शकते. धोनीने स्वत: चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु वाढत्या वयामुळे तंदुरुस्तीचे आव्हान आणि युवा खेळाडूंना संधी देण्याच्या हेतूने तो कधीही निवृत्तीचा निर्णय जाहीर करू शकतो. पुढील वर्षी ‘आयपीएल’मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार असून चेन्नईलासुद्धा नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे चौथ्यांदा चषक उंचावल्यानंतर आता कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदांची बरोबरी साधण्यासाठी चेन्नई पुढील हंगामात कोणत्या खेळाडूंची निवड करणार, याविषयी आतापासूनच चर्चेला सुरुवात झाली आहे.

करोनाचा शिरकाव आणि कंटाळवाणा उत्तरार्ध

यंदा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांविना भारतात ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाला प्रारंभ झाला. महिन्याभराच्या कालावधीत एका सुपर-ओव्हरसह असंख्य रोमहर्षक सामने चाहत्यांना पाहायला मिळाले. परंतु मे महिन्यात काही संघांतील खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आली. वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा, वृद्धिमान साहा, अमित मिश्रा यांना करोनाची लागण झाल्याने सर्व संघांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडून निसटले, तर अनेकांनी उर्वरित हंगामासाठी भारतात न येण्यालाच प्राधान्य दिले. मात्र अथक प्रयत्नांनंतर ‘बीसीसीआय’ने विश्वचषकापूर्वीच ‘आयपीएल’च्या उर्वरित सामन्यांचे अमिरातीत आयोजन करण्याचा निर्णय घेतला. थेट १९ सप्टेंबरपासून अमिरातीत उर्वरित हंगाम खेळवण्यात आला. मात्र या उत्तरार्धात अनेक लढती एकतर्फी झाल्या. गतविजेता मुंबईचा संघ बाद फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडल्याने चाहत्यांची उत्सुकताही कमी झाली, हे नाकारता येणार नाही.

कोहलीचा राजीनामा; कोलकाताचा कायापालट

विराट कोहलीने हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाविषयी सगळीकडेच चर्चा रंगली. याशिवाय पहिल्या टप्प्यात सातपैकी अवघे पाच सामने जिंकणाऱ्या कोलकाताने थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारून सर्वानाच आश्चर्यचकित केले. बेंगळूरुला कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही जेतेपद न पटकावता आल्याने त्याचे चाहते नाराज झाले. या संघातील काही खेळाडूंना हुल्लडबाज प्रेक्षकांच्या शेरेबाजीलासुद्धा सामोरे जावे लागले. डेव्हिड वॉर्नरची सनरायजर्स हैदराबादमधून झालेली हकालपट्टी आणि हंगामाच्या अखेरीस उमरान मलिकच्या रूपात गवसलेला वेगवान गोलंदाज हे मुद्देसुद्धा चर्चेचा विषय ठरले.rushikesh.bamne@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chennai super kings won ipl 2021 chennai super kings win 4th title zws

ताज्या बातम्या