आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग दरवर्षी खेळवण्यात येते. यंदा या लीगचा शुभारंभाचा सामना चक्क चेन्नईत होणार आहे. लीग ऑस्ट्रेलियाची, बहुतांश खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आणि सामना चेन्नईत असं अनोखं समीकरण पाहायला मिळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांच्यातील मैत्री दृढ होत असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

१२ डिसेंबरला मेलबर्न रेनेगेड्स आणि गतविजेते पर्थ स्क्रॉचर्स हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याच्या आयोजनाला चाहत्यांनी पाठिंबा दिला तर भविष्यात आयपीएलचे काही सामने ऑस्ट्रेलियात खेळवले जाऊ शकतात असे संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहेत. चेन्नईचे चाहते चांगल्या क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामुळेच या सामन्यासाठी चेन्नईची निवड करण्यात आली आहे.

१२ डिसेंबरला दुपारी ३ पासून हा सामना सुरू होईल. याच दिवशी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान पर्थ कसोटी सामना आहे. पर्थ ऑस्ट्रेलियाच्या एका टोकाला असल्याने कसोटी सामना सुरू असतानाच भारतात हा सामना होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला भेट दिली. त्यावेळी हा सामना भारतात होणार अशी घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांच्या सरकारं या सामन्याच्या आयोजनासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत.

कॅरेबियन प्रीमिअर लीगचे काही सामने अमेरिकेत होतात. सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तान सुपर लीग युएईत खेळवण्यात येत असे. सार्वत्रिक निवडणुकांमुळे २००९ मध्ये आयपीएल हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. ही काही मोजकी उदाहरणं सोडली तर एका देशाच्या डोमेस्टिक लीगचे सामने अन्य देशात खेळवण्यात येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्क्रॉचर्स संघ ६ डिसेंबरला भारतासाठी रवाना होतील जेणेकरून खेळपट्टी, वातावरण यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना वेळ मिळेल.

आयपीएल स्पर्धेतल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा चेपॉक स्टेडियम हा बालेकिल्ला आहे. डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता नसेल हे गृहित धरून तारीख ठरवण्यात आली आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया राखीव दिवस असावा यासाठी प्रयत्नशील आहे. मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्क्रॉचर्स या संघांचं स्वरुप काही महिन्यांनंतरच स्पष्ट होईल पण तूर्तास तरी मिचेल मार्श, कूपर कॉनली, जोश इंगलिस, झाय रिचर्डसन यांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी चेन्नईकरांना मिळणार आहे. चेन्नईची संथ आणि धीम्या खेळपट्टी फिरकीला पोषक समजली जाते. त्यानुसार दोन्ही संघ डावपेच आखण्याची शक्यता आहे.