उपांत्य फेरीमधील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आलेल्या एफसी पुणे सिटीची आज पुण्यात चेन्नईयन एफसीशी लढत होत आहे. या सामन्यात चेन्नईयन पराभूत झाले, तर नॉर्थईस्ट युनायटेड उपांत्य फेरीत प्रवेश करेल. हा सामना बरोबरीतदेखील सुटला, तर कोलकाता, गोवा, दिल्लीसमवेत चेन्नईयन उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी होईल. त्यामुळेच, टॉप फोरमधील चौथ्या स्थानावर कोणता संघ संधी साधणार, हे पुणेकरांच्या खेळावर अवलंबून आहे.
इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पुण्याने धडाक्यात प्रारंभ केला होता, पण २७ ऑक्टोबरनंतर त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याचाच फटका त्यांना बसला. प्रतिस्पध्र्याच्या मदानात जाऊन सामना जिंकण्याची क्षमता पुण्याच्या संघात दिसून आली नाही. परिणामी, ऑक्टोबरमध्ये दोनदा गुणतक्त्यामध्ये अग्रस्थानी राहिल्यानंतरदेखील आता यंदाच्या स्पध्रेच्या अखेरच्या टप्प्यात स्पध्रेबाहेर पडण्याची नामुष्की पुण्यावर ओढवली.
दुसरीकडे, चेन्नईयनने निर्धाराने खेळ केला. प्रारंभी टॉप फोरमध्ये विराजमान झाल्यानंतर ते चक्क तळाच्या स्थानांवर फेकले गेले होते; पण त्यानंतर चेन्नईयनच्या खेळाडूंनी व्यावसायिक वृत्ती आणि कौशल्यपूर्ण आक्रमक खेळाची प्रचीती देत विजयश्री अक्षरश: खेचून आणली. स्टीव्हन मेंडोझा, इलानो ब्लूमर आदींच्या धडाक्याने सातत्याने गोल करत चेन्नईयनने आगेकूच केली.