ड्वेन ब्राव्होची भेदक गोलंदाजी आणि फलंदाजांच्या योगदानामुळे चेन्नई सुपर किंग्जने शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला ६ गडी आणि ११ चेंडू राखून शह दिला.

बेंगळूरुने दिलेले १५७ धावांचे आव्हान चेन्नईने १८.१ षटकांत गाठत सलग दुसरा आणि नऊ सामन्यांत सातवा विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड (३८) आणि फॅफ डय़ू प्लेसिस (३१) यांनी ७१ धावांची सलामी दिली. यानंतर अंबाती रायुडू (३२), मोईन अली (२३), सुरेश रैना (नाबाद १७) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी (नाबाद ११) यांनी चेन्नईला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, बेंगळूरुकडून देवदत्त पडिक्कल (७०) आणि कर्णधार विराट कोहली (५३) यांनी दिमाखदार शतकी सलामी दिली. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त बेंगळुरूचा एकही फलंदाज १५ धावांचा टप्पा पार करू शकला नाही. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : २० षटकांत ६ बाद १५६ (देवदत्त पडिक्कल ७०, विराट कोहली ५३; ड्वेन ब्राव्हो ३/२४, शार्दूल ठाकूर २/२९) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १८.१ षटकांत ४ बाद १५७ (ऋतुराज गायकवाड ३८, अंबाती रायडू ३२; हर्षल पटेल २/२५)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट