चेन्नई : खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाला सोमवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत फ्रान्सने २-२ असे बरोबरीत रोखले. तसेच दोन्ही विभागांतील भारताच्या ‘क’ संघांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारताच्या सहाही संघांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले होते. चौथ्या फेरीत मात्र भारताच्या तीन संघांची विजयाची मालिका खंडित झाली. खुल्या विभागातील भारताच्या ‘अ’ संघाला फ्रान्सविरुद्ध सर्वोत्तम खेळ करता आला नाही. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाला जुल्स मोसार्ड, विदित गुजराथीला लॉरेंट फ्रेसिनेट, अर्जुन इरिगेसीला मॅथेऊ कॉर्नेट आणि एस. एल. नारायणनला मॅक्सिम लग्रेडने बरोबरीत रोखले. भारताच्या ‘क’ संघाने स्पेनकडून १.५-२.५ अशी हार पत्करली. सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन आणि मुरली कार्तिकेयन यांचे सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे भारताची अभिजित गुप्तावर भिस्त होती. मात्र, तो डेव्हिड अँटोनकडून ४१ चालींमध्ये पराभूत झाल्याने भारताच्या ‘क’ संघाचाही पराभव झाला.

भारताच्या ‘ब’ संघाला मात्र विजयी घोडदौड कायम ठेवण्यात यश आले. त्यांच्या डी. गुकेश आणि निहाल सरिन यांनी विजयांची नोंद केली. रौनक साधवानी आणि आर. प्रज्ञानंद यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.

महिला विभागात भारताच्या ‘अ’ संघाने हंगेरीवर २.५-१.५ अशा फरकाने मात केली. कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिकासह आर. वैशालीचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, तानिया सचदेवने अनुभव पणाला लावत ५२ चालींमध्ये सोका गालवर निर्णायक विजय मिळवल्यामुळे भारतीय ‘अ’ संघाला सलग चौथ्या विजयाची नोंद करता आली. तसेच ‘ब’ संघाने इस्टोनियाला २.५-१.५ असे पराभूत केले. ‘क’ संघाने मात्र निराशाजनक कामगिरी करताना जॉर्जियाकडून १-३ असा पराभव पत्करला. या संघाच्या इशा करवडे, साहिथी वर्षिनी आणि प्रत्युशा बोड्डा पराभूत झाल्या. केवळ पी. व्ही. नंधिधाला विजय मिळवण्यात यश आले.