scorecardresearch

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताच्या ‘अ’ संघाची ‘क’ संघावर मात

अर्जुन इरिगेसी आणि एसएल नारायणन यांच्या निर्णायक विजयांमुळे खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाने शुक्रवारी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारताच्या ‘क’ संघावर ३-१ अशा फरकाने मात केली.

sp arjun erigesi
अर्जुन इरिगेसी

वृत्तसंस्था, चेन्नई : अर्जुन इरिगेसी आणि एसएल नारायणन यांच्या निर्णायक विजयांमुळे खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाने शुक्रवारी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत भारताच्या ‘क’ संघावर ३-१ अशा फरकाने मात केली.

या स्पर्धेत प्रथमच दोन भारतीय संघ आमनेसामने आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. भारताच्या ‘अ’ संघात आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असल्याने त्यांचे या लढतीत पारडे जड मानले जात होते. मात्र, ‘क’ संघाने त्यांना चांगली झुंज दिली. ‘अ’ संघाकडून पहिल्या दोन पटांवर खेळणाऱ्या पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना अनुक्रमे सूर्यशेखर गांगुली आणि एस. पी. सेतुरामन यांनी बरोबरीत रोखले. परंतु तिसऱ्या पटावरील इरिगेसीने अभिजित गुप्ताला ४६ चालींमध्ये नमवले, तर नारायणनने अभिमन्यू पुराणिकचा ३८ चालींमध्ये पराभव केल्याने भारताच्या ‘अ’ संघाने या लढतीत सरशी साधली.

याच विभागातील भारताच्या ‘ब’ संघाने क्युबाला ३.५-०.५ असे पराभूत केले. डी. गुकेशने सलग सातव्या विजयाची नोंद करताना कार्लोस कब्रेरावर ४६ चालींमध्ये मात केली. तसेच निहाल सरिन आणि आर. प्रज्ञानंद यांनाही विजय मिळवण्यात यश आले. अनुभवी बी. अधिबनला मात्र ओमार क्विंटानाने बरोबरीत रोखले.

महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवताना अझरबैजानचा २.५-१.५ असा पराभव केला. त्यांचा हा सलग सातवा विजय ठरला. पहिल्या पटावरील कोनेरू हम्पीने गुनाय ममाझादाकडून हार पत्करली. परंतु आर. वैशाली आणि तानिया सचदेव यांनी आपापले सामने जिंकत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. द्रोणावल्ली हरिकाचा सामना बरोबरीत सुटल्याने भारतीय ‘अ’ संघाचा विजय सुनिश्चित झाला. या लढतीपूर्वी भारत ‘अ’ आणि अझरबैजान हे संघ महिला विभागाच्या गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर होते. त्यामुळे भारतीय ‘अ’ संघासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. भारताच्या ‘ब’ संघाने ग्रीसकडून पराभव पत्करला, तर ‘क’ संघाने स्वित्र्झलडवर ३-१ अशी मात केली. ‘क’ संघाकडून इशा करवडे आणि पी. व्ही. नंधिधाने विजय मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chess olympiad tournament india a team beat c team arjuna irrigaceae victories ysh