बुद्धिबळात वयापेक्षाही तल्लख बुद्धी व एकाग्रता यालाच अधिक महत्त्व आहे. भारताच्या विश्वनाथन आनंद या अनुभवी खेळाडूने अजूनही आपण अव्वल दर्जाचा खेळ करू शकतो याचा प्रत्यय घडविला. त्यामुळेच जागतिक आव्हानवीर स्पर्धेत शेवटच्या फेरीपर्यंत चुरस राहिली व त्यामध्ये सर्जी कर्जाकिन या तरुण खेळाडूने बाजी मारली. आता त्याच्यासमोर मॅग्नस कार्लसनचे आव्हान असणार आहे.

विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या या स्पर्धेत जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाल्यामुळे विलक्षण चढाओढ पाहावयास मिळाली. शेवटच्या फेरीपर्यंत ही स्पर्धा कोण जिंकणार हे कोणताही विश्लेषक सांगू शकत नव्हता. शेवटच्या फेरीत कर्जाकिनने फॅबिआनो कारुआनावर मात करत अजिंक्यपद पटकाविले. कारुआनाला दुसरे स्थान मिळाले तर आनंदला तिसरा क्रमांक मिळाला. नोव्हेंबरमध्ये विश्वविजेतेपदाची लढत अमेरिकेत होणार आहे. आव्हानवीर स्पर्धा सुरू असताना विविध इंटरनेट संकेतस्थळांवर लढतींविषयी विविध तज्ज्ञांची मते दिली जात होती. त्यामध्येही कार्लसन व आनंद यांच्यातच पुन्हा जगज्जेतेपदाची लढत व्हावी अशी इच्छा अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत होते. भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीस जेवढे महत्त्व असते तेवढेच महत्त्व आनंद व कार्लसन यांच्यातील लढतीसाठी असते.

आव्हानवीर स्पर्धेसाठी कर्जाकिन, कारुआना व आनंद यांच्याबरोबरच पीटर स्विडलर, हिकारू नाकामुरा, अनिष गिरी, व्हॅसेलीन तोपालोव, लिवॉन आरोनियन हे खेळाडूही पात्र ठरले होते. या खेळाडूंची यापूर्वीची कामगिरी लक्षात घेतली तर आव्हानवीर स्पर्धा जिंकणेही सोपे नव्हते. प्रत्येक खेळाडूने यापूर्वी जागतिक स्तरावर अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. चौदा  फे ऱ्यांमध्ये प्रत्येक खेळाडूला आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर दोन वेळा झुंज देण्याची संधी होती. साहजिकच प्रत्येक खेळाडूला पांढऱ्या व काळ्या मोहरांनी डावपेच करण्यासाठी पुरेसा वाव मिळाला होता.

कर्जाकिनने या चौदा डावांपैकी चार डावांमध्ये विजय मिळविला तर नऊ डावांमध्ये बरोबरी स्वीकारली. या स्पर्धेत त्याने केवळ एकाच डावात पराभव स्वीकारला. हा पराभवाचा धक्का त्याला आनंदने दिला. स्पर्धेतील चौथ्या फेरीत त्याने आनंदवर मात केली होती. मात्र अकराव्या फेरीत आनंदने त्याच्यावर मात करीत पराभवाची परतफेड करत स्पर्धेतील चुरस शेवटपर्यंत ठेवली. कर्जाकिन हा डावाच्या शेवटच्या टप्प्यात अतिशय सफाईदार चाली करतो. शेवटच्या चालीपर्यंत संयम ठेवीत व कोणतेही दडपण न घेता खेळणे हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्याने आनंदखेरीज नाकामुरा, तोपालोव व कारुआना यांच्याविरुद्धच्या डावात विजय मिळविला.

कर्जाकिन हा मूळचा युक्रेनचा खेळाडू. मात्र बुद्धिबळामध्येच कारकीर्द घडवण्याच्या वेडाने झपाटलेल्या कर्जाकिनने पाचव्या वर्षांपासूनच खेळाचा सराव सुरू केला. वयाच्या ११ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला. बारा वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळविले. जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचाही मान त्याने मिळविला. त्या वेळी त्याचे वय अवघे १२ वर्षे सात महिने होते. आजपर्यंत त्याने नॉर्वे चषक स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे. कोरस चषक, जागतिक जलद डाव स्पर्धा आदी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. संगणक प्रणालीविरुद्ध झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद त्यानेच मिळविले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने युक्रेनकडून तीन वेळा, तर रशियाकडून तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी सहा पदकांची कमाई केली आहे. कार्लसन व कर्जाकिन यांच्या वयात फारसे अंतर नसल्यामुळे त्यांच्यातील विश्वविजेतेपदाची लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. कार्लसन याने लागोपाठ दोन वेळा जगज्जेता होण्याचा मान मिळविला आहे. बुद्धिबळाच्या सर्व स्वरुपांच्या डावात त्याने आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. हे लक्षात घेता त्याच्यावर मात करण्यासाठी कर्जाकिन याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे.

आव्हानवीर स्पर्धा सुरू असताना विविध इंटरनेट संकेतस्थळांवर आनंदविषयी अनेक वेळा टीकात्मक टिप्पणी केली जात होती. आनंदने निवृत्त व्हावे व घरी बसून मुलाचा अभ्यास घ्यावा, त्याने चेन्नईत लहान मुलांनाच शिकवावे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भाग घेऊ नये अशा शब्दांमध्ये त्याची अवहेलना करण्यात आली. नाकामुरा, तोपालोव, आरोनियन आदी मातब्बर खेळाडूंचा सहभाग असतानाही आनंदने आव्हानवीर स्पर्धेत तिसरे स्थान घेतले ही काही कमी दर्जाची कामगिरी नाही. दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या कारुआनाइतकेच त्याचे साडेसात गुण झाले. कर्जाकिनपेक्षा केवळ एक गुणानेच तो कमी पडला. ही कामगिरी आनंद अद्याप संपलेला नाही हे सिद्ध करणारीच आहे. कार्लसनविरुद्धच्या लढतीसाठी कर्जाकिन हा आनंदची मदत निश्चित घेईल. कारण त्याच्यासाठीही आनंद हा प्रेरणास्थानच आहे.

milind.dhamdhere@expressindia.com