पीटीआय, चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. प्रज्ञानंदने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीला ३.५-२.५ असा पराभवाचा धक्का दिला. उपांत्य फेरीत चार डावांअंती दोन्ही खेळाडूंमध्ये २-२ अशी बरोबरी होती. मग बरोबरीची कोंडी सोडवण्यासाठी झालेल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदने बाजी मारत अंतिम फेरीतील स्थान सुनिश्चित केले. या फेरीत त्याच्यापुढे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या िडग लिरेनचे आव्हान असेल. लिरेनने उपांत्य फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना पाच वेळा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर २.५-१.५ अशी मात केली.

बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात १६ वर्षीय प्रज्ञानंदविरुद्ध जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या गिरीचे पारडे जड मानले जात होते. परंतु, पहिल्या डावापासून प्रज्ञानंदने गिरीला उत्तम झुंज दिली. पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात विजयाची नोंद केली. तिसऱ्या डावात सुरुवातीच्या चालींमध्ये गिरीने वर्चस्व गाजवले. मात्र, प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन करताना हा डाव बरोबरीत सोडवला आणि एकूण लढतीत २-१ अशी आघाडी मिळवली. परंतु, गिरीने आपला अनुभव पणाला लावताना चौथा डाव जिंकल्याने लढतीत २-२ अशी बरोबरी झाली.

विजेता ठरवण्यासाठी झालेल्या टायब्रेकरच्या पहिल्या अतिजलद (ब्लिट्झ) डावात गिरीला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. त्याने ३३ चालींअंती या डावात हार पत्करली. त्यामुळे आपले आव्हान कायम राखण्यासाठी टायब्रेकरच्या दुसऱ्या डावात गिरीला विजय अनिवार्य होता. मात्र, प्रज्ञानंदने त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. हा डाव बरोबरीत सुटल्यामुळे प्रज्ञानंदने अंतिम फेरीत प्रवेश केला.

सामन्यानंतर काही तासांतच ११वीची परीक्षा!

प्रज्ञानंदचा गिरीविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर काही तासांतच त्याला इयत्ता ११वीची परीक्षा देण्यासाठी हजर राहावे लागले. ‘‘मला सकाळी ८.४५ वाजेपर्यंत महाविद्यालयात पोहोचायचे आहे आणि आता रात्रीचे २ वाजले आहेत,’’ असे सामन्यानंतर प्रज्ञानंदने सांगितले. तसेच परीक्षा दिल्यानंतर साधारण १२ तासांनी तो लिरेनविरुद्ध अंतिम सामना खेळेल. ‘‘माझी वाणिज्य शाखेची परीक्षा आहे. मी या परिक्षेत उत्तीर्ण होईन अशी आशा आहे. परीक्षा चांगली गेली आणि अंतिम सामन्यात विजयही मिळवण्यात यश आले, तर मला आणखी काय हवे? मात्र, परिक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा सामना जिंकण्याचा आनंद अधिक असेल,’’ असेही प्रज्ञानंद हसतमुखाने म्हणाला.