पीटीआय, चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला झुंजार खेळानंतरही चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीच्या दोन लढतींअंती असलेली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी दोन डावांचा टायब्रेकर झाला आणि यात जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील डिंग लिरेनने प्रज्ञानंदला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.

१६ वर्षीय प्रज्ञानंदने अंतिम फेरीतील पहिली लढत १.५-२.५ अशा फरकाने गमावली होती. त्यामुळे जेतेपदाच्या आशा कायम राखण्यासाठी त्याने चार डावांची दुसरी लढत जिंकणे अनिवार्य होते. त्याने सुरुवातीपासून अप्रतिम खेळ केला. पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात प्रज्ञानंदने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठय़ा लिरेनला ७९ चालींमध्ये पराभूत केले. त्यामुळे त्याला १.५-०.५ अशी आघाडी मिळाली. त्यानंतरचे दोन्ही डाव बरोबरीत सुटल्यामुळे प्रज्ञानंदला अंतिम फेरीची दुसरी लढत २.५-१.५ अशा फरकाने जिंकण्यात यश आले.   

त्यानंतर या स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी दोन अतिजलद (ब्लिड्झ) डाव खेळवण्यात आले. पहिल्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदला विजयाची संधी होती. मात्र, लिरेनने अखेरच्या काही चालींमध्ये पुनरागमन करत हा डाव बरोबरीत सोडवला. त्यानंतर दुसऱ्या डावात काळय़ा मोहऱ्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदने सुरुवातीला दर्जेदार खेळ केला. मात्र, डाव संपायला काही मिनिटे शिल्लक असताना त्याने चुका केल्या आणि अनुभवी लिरेनने याचा फायदा घेतला. त्याने ४९ चालींमध्ये विजयाची नोंद करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

लिरेन, रमेश यांच्याकडून कौतुक

अंतिम फेरीत प्रज्ञानंदने केलेल्या झुंजार खेळाचे प्रशिक्षक आर.बी. रमेश आणि प्रतिस्पर्धी लिरेन यांनी कौतुक केले. ‘‘प्रज्ञानंदला पराभूत केल्याबद्दल डिंग लिरेनचे अभिनंदन. प्रज्ञानंद, मला तुझा अभिमान आहे. अवघड परिस्थितीत तू संयमाने आणि जिद्दीने खेळ केला,’’ असे रमेशने ‘ट्वीट’ केले. तसेच प्रज्ञानंदचे भविष्य उज्ज्वल असून त्याच्यात मोठा खेळाडू होण्याची क्षमता असल्याचे अंतिम फेरीनंतर लिरेन म्हणाला.