Cheteshwar Pujara Advice To Axar Patel: भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप चॅम्पियन बनवणारा उपकर्णधार अक्षर पटेल आता आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारताचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अक्षर पटेलला मोलाचा सल्ला दिला आहे. यासह सावध राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या.
स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना चेतेश्वर पुजाराने अक्षर पटेलला आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी मोलाचा सल्ला दिला. पुजारा म्हणाला, “अक्षर पटेल खूप शांत स्वभावाचा आहे. तो स्वतःवर दडपण येऊ देत नाही. त्याचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. विशेषतः आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत, जिथे खूप जास्त दबाव असतो. तो नेहमी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा राहतो. पण त्याने जास्त निष्काळजी होऊ नये. कारण त्यामुळे गाडी रुळावरून घसरते. गेल्या हंगामात दिल्लीचा संघ दमदार फॉर्ममध्ये होता. दिल्लीने लय पकडली होती, ती त्यांनी गमावली. या हंगामात त्यांना या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल.”
अक्षर पटेल गेल्या हंगामातही दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या हंगामातील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये दिल्लीने दमदार कामगिरी केली होती. सुरवातीच्या चारही सामन्यांमध्ये दिल्लीने विजय मिळवला. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली. दिल्लीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण पुढील सामने गमावल्याने दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. १४ पैकी ७ सामने जिंकून दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी राहिला.
गेल्या हंगामात अक्षर पटेलला गोलंदाजीत आपली छाप सोडता आली नव्हती. त्याला केवळ ५ गडी बाद करता आले होते. मात्र माजी खेळाडू मोहम्मद कैफला विश्वास आहे की, तो आगामी हंगामात दमदार कामगिरी करेल. मोहम्मद कैफ म्हणाला, “अक्षर पटेल नव्या चेंडूने गोलंदाजी करू शकतो. पण अडचण अशी आहे की, त्याच्याकडे वाचवण्यासाठी धावा खूप कमी होत्या. यावेळीही तो नव्या चेंडूने गोलंदाजी करेल. यासह त्याला कुलदीप यादव आणि विपराज निकम यांची साथ मिळेल. गेल्या हंगामात तो चांगली कामगिरी करू शकला नाही, पण या हंगामात तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.”
