Cheteshwar Pujara All Time Great Playing XI: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने आपली ऑल टाईम ग्रेट प्लेईंग ११ निवडली आहे. या प्लेईंग ११ मध्ये त्याने अशा खेळाडूंची निवड केली आहे, ज्या खेळाडूंसोबत त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. पण मुख्य बाब म्हणजे, त्याने या प्लेईंग ११ मधून रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि एमएस धोनीसारख्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवलं आहे. पुजाराने २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याला भारतीय संघासाठी १०३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ७१९५ धावा केल्या. दरम्यान पुजाराने आपल्या आवडत्या ११ खेळाडूंच्या यादीत कोणाला स्थान दिलं? जाणून घ्या.
क्रिकइन्फोने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पुजाराने आपल्या आवडत्या ११ खेळाडूंनी नावं सांगितली आहेत. या संघात त्याने अशा ११ खेळाडूंची नावं सांगितली आहेत, जे खेळाडू या १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्यासोबत होते. त्याने सलामीवीर फलंदाज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांची निवड केली आहे. राहुल द्रविडने १९९६ ते २०१२ दरम्यान भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने १३२६५ धावा केल्या. तसेच वीरेंद्र सेहवागने २००१ ते २०१३ दरम्यान भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने ८५०३ धावा केल्या. तर पुजाराने स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं आहे.
तसेच भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर आणि भारताचा ऑल टाईम ग्रेट फलंदाज विराट कोहलीला त्याने पाचव्या क्रमांकावर ठेवलं आहे. सचिन तेंडुलकरच्या नावे २०० कसोटी सामने खेळण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने १५९२१ धावा केल्या आहेत. तर कोहलीला १२३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ९२३० धावा केल्या. तर व्हीव्हीएस लक्ष्मणला सहाव्या क्रमांकावर ठेवलं आहे. लक्ष्मणला भारतीय संघाकडून १३४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एमएस धोनीऐवजी स्टार फलंदाज ऋषभ पंतची निवड केली आहे.
या गोलंदाजांची केली निवड
पुजाराने भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या फलंदाजांची निवड केली आहे. तर गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि आर अश्विनची निवड केली आहे. दोघांनीही भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहची निवड केली आहे. तर १२ वा खेळाडू म्हणून त्याने वेगवान गोलंदाज इशांत शर्माची निवड केली आहे.
