काऊंटी क्रिकेटमधल्या आपल्या जबाबदाऱ्यांमुळे यंदाच्या अर्जुन पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहु शकणार नाही, असं भारताचा कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हणलं आहे. पुजारा सध्या नॉटींगहॅमशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळतो आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर पुजारा नॉटींगहॅमशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी रवाना झाला आहे. श्रीलंकेच्या संघाला ३-० अशी मात देण्यात पुजाराचा मोठा वाटा आहे. यंदाच्या कामगिरीसाठी मला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र दुर्दैवाने मी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहु शकत नाही. आतापर्यंत खेळाप्रती मी जी एकनिष्ठता दाखवली आहे, त्याचा मला नेहमी फायदा झालाय. त्यामुळे सध्या माझ्यावरची जबाबदारी सोडून मी पुरस्कार स्विकारण्यासाठी जाऊ शकत नाहीये. आपल्या फेसबूक पेजवर पुजाराने ही घोषणा केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पुजाराने ३ कसोटीत ३०९ धावा काढल्या आहेत. याचसोबत त्याच्या नावावर नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत २ शतकंही जमा आहेत. पुजाराच्या फेसबूक पेजवर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या निर्णयाबद्दल त्याचं मनापासून कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – मी तुझ्यामुळे जखमी झालो, लोकेश राहुलने पुजाराला सुनावलं