भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आंतराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत (आयसीसी) सातव्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीत आर.अश्विनच्या स्थानात बदल झाला नसून तो पाचव्या स्थानी कायम आहे. आयसीसीने आज (गुरूवार) फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी क्रमवारी जाहीर केली.
आयसीसीच्या पहिल्या वीस फलंदाजांच्या यादीत भारताचे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांनाच स्थान मिळवता आले आहे. विराट कोहली कसोटी क्रमवारीत २०व्या स्थानी आहे. तर, चेतेश्वर पुजाराची क्रमवारीत घसरण होऊन त्याला सातवे स्थान मिळाले आहे. गोलंदाजांच्या यादीत प्रग्यान ओझाने एका स्थानाची प्रगती करत आठवे स्थान प्राप्त केले आहे. इतर संघांच्या खेळाडूंवर नजर टाकल्यास, ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱया डेव्हिड वॉर्नरने तब्बल तीन स्थानांची प्रगती करत दहावे स्थान मिळविले आहे.