पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीची अर्जेटिनावर मात; २३ वर्षांनंतरही जेतेपदाची पाटी कोरीच

बदली खेळाडूच्या बाकावर बसलेला लिओनेल मेस्सी.. डोळ्यांत अश्रूंच्या धारा, शून्यात लागलेली नजर.. दुसरीकडे मैदानावर जल्लोष करणारे चिलीचे खेळाडू.. कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या शतकमहोत्सवी वर्षांच्या अंतिम सामन्यानंतरचे हे चित्र. न्यू जर्सी येथे सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत गतविजेत्या चिलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी बाजी मारून पुन्हा एकदा अर्जेटिनावर मात केली. एका खेळाडूपेक्षा सांघिक प्रयत्न महत्त्वाचे असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

सार्वकालीन महान खेळाडू असलेल्या मेस्सीला अर्जेटिनासाठी पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्यात अपयश आले. १२० मिनिटांच्या खेळात गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटचा निर्णय झाला. २०१५च्या कोपा अमेरिका स्पध्रेच्या अंतिम सामन्याचे पुनर्प्रक्षेपण पाहत असल्याचे भासत होते.

चिलीच्या आर्टुरो व्हिदालने पेनल्टीची पहिली संधी गमावल्यानंतर अर्जेटिनाचा मेस्सी पुढे सरसारवला. गोल करण्यात माहीर मेस्सी अर्जेटिनाला आघाडी मिळवून देईल असे वाटत होते, परंतु नशिबानेच त्याची थट्टा करण्याचे ठरवले असावे. मेस्सीने उजव्या दिशेने टोलवलेला चेंडू.. गोलरक्षक क्लाउडीओ ब्राव्होने डाव्या दिशेला घेतलेली झेप अन् गोलजाळीवरून थेट प्रेक्षकांमध्ये पोहोचला चेंडू.. त्यानंतर लुकास बिग्लिआचा प्रयत्न अपयशी ठरवून ब्राव्होने चिलीचा विजय निश्चित केला. फ्रान्सिस्को सिल्व्हाने गोल करून चिलीच्या विजयावर ४-२ असे शिक्कामोर्तब केले.

१९९३ नंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदासाठी जंग जंग पछाडणाऱ्या अर्जेटिनाच्या वाटय़ाला पुन्हा अपयश आले. बार्सिलोनासाठी गोलचा पाऊस पाडणाऱ्या लिओनेल मेस्सीला सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या निराशाजनक कामगिरीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीलाही रामराम केला. या पराभवामुळे अर्जेटिनाची २३ वर्षांची जेतेपदाची प्रतीक्षा अजून लांबणीवर गेली आहे. ८२,०२६ प्रेक्षकांच्या साक्षीने मैदानावर उतरलेल्या चिली आणि अर्जेटिना संघांनी लौकिकास साजेसा खेळ केला.

पहिल्या सत्रात ब्राझीलचे पंच हेबेर लोपेसने दोन्ही संघांतील एका खेळाडूला लाल कार्ड दाखवून बाहेर केले. चिलीच्या मार्सेलो रोजासला २८व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने मैदान सोडवे लागले, तर अर्जेटिनाच्या मार्कस रोजोला थेट लाल कार्ड दाखवण्यात आले. २१व्या मिनिटाला अर्जेटिनाला गोल करण्याची संधी मिळाली होती. चिलीच्या बचावपटूंमध्ये झालेल्या घोळाचा फायदा मात्र अर्जेटिनाला उचलता आला नाही. त्यानंतर दोन्ही संघांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरूच होते. जबरदस्त आक्रमण आणि तितकाच अभेद्य बचाव, यामुळे दोन्ही संघांना १२० मिनिटांच्या खेळात गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

०४ कोपा अमेरिका स्पध्रेच्या मागील पाच हंगामांपैकी चारमध्ये अर्जेटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चारही वेळेला (ब्राझील २००४ व २००७, चिली २०१५ व २०१६) त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

गोल्डन बॉल – अ‍ॅलेक्सिस सांचेझ (३ गोल)

गोल्डन बूट – एडुआडरे व्हॅर्गास (६ गोल)

गोल्डन ग्लोज – क्लाउडीओ ब्राव्हो

 

या क्षणाचा आम्ही आस्वाद घेणार आहे. आशा आहे की संघ पुढेही सातत्यपूर्ण कामगिरी करेल आणि विकसित होत राहील.

– जुआन अँटोनियो पिझ्झी, चिलीचे प्रशिक्षक

 

ही दुर्दैवी घटना आहे. हा भावुक निर्णय आहे आणि त्याने याचा पुनर्विचार करायला हवी. २९ वर्ष, हे निवृत्ती घेण्याचे वय नाही. हा निर्णय मागे घेण्यासाठी मॅरेडोना यांनी मेस्सीला विनंती करावी.

– बायचुंग भुतिया, भारताचा माजी कर्णधार

 

घाईघाईत घेतलेला निर्णय. त्याच्याकडून आणखी योगदानाची अपेक्षा होती. दिग्गज इतक्या सहज हार मानत नाही.

– निर्मल छेत्री, भारताचा माजी फुटबॉलपटू

 

आंतरराष्ट्रीय फुटबॉलसाठी आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा फटका आहे.

– आनदी बारुआ, माजी फुटबॉलपटू

 

त्याच्या या निर्णयाने मी आश्चर्यचकित झालो. अशी कल्पनाही मी केली नव्हती.

– सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार

 

जागतिक फुटबॉलसाठी ही मोठी हानी आहे. पराभवानंतर त्याला झालेली वेदना आपण पाहिली. त्यामुळेच हा निर्णय घेतला.

– पी. के. बॅनर्जी, भारताचे माजी दिग्गज फुटबॉलपटू