“सध्या Vocal for Local चा नारा दिला जात आहे. पण हे तितक सोपं नाही. गेल्या दशकभरात भारतीय सरकारची क्रीडा मालासंदर्भातल्या धोरणांमुळेच आज भारतीय बाजारपेठेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त चिनी वस्तू आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारतीय क्रीडा क्षेत्रात ५० टक्के माल हा चिनीमधूनच आयात केला जातो.” क्रीडा साहित्याचं उत्पादन करणाऱ्या Vats या भारतीय ब्रँडचे मॅनेजिंग डिरेक्टर लोकेश वत्स यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली.
भारताच्या प्रत्येक महत्वाच्या क्रीडा प्रकारात चीनने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भारत चीनकडून किती प्रमाणात क्रीडा साहित्य आयात करत याचा अंदाज या आकडेवारीवरुन येईल.
- जिम व अॅथलेटिक्स इक्विपमेंट – १ हजार २ कोटी
- बॅटमिंटन रॅकेट – १३०.३१ कोटी
- टेबल टेनिस – १७.७७ कोटी
- फुटबॉल – १८.५७ कोटी (Machine stitched Balls)
- इतर क्रीडा साहित्य – ३५७.३२ कोटी
(माहिती सौजन्य – भारतीय उद्योग आणि व्यापार विभाग, आयात-निर्यात २०१८-१९)
भारताचा टेबल टेनिसपटू सत्यन गणशेखरनच्या मते, टेबल टेनिसमध्ये रॅकेट आणि टेबल या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. परंतू चिनीमध्ये तयार होणाऱ्या बॉलवर आपल्याला अवलंबून रहावं लागतं. टेबल टेनिसमधील बहुतांश आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शांघाई येखील कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. भारतीय बॉक्सर्सही ऑस्ट्रेलियातील स्टिंग या ब्रँडचं साहित्य वापरत असले तरीही याचं उत्पादन चीनमध्येच होतं. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी जय कवळी यांच्या माहितीप्रमाणे, “भारतात बॉक्सिंग साहित्य बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतू त्यांना भारतामध्येच पुरेसा व्यवसाय होत असल्याने त्या कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर माल बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. यासाठी प्रमुख खेळाडूंच्या सरावाकरता बाहेरुन साहित्य मागवावं लागतं.” २०१८-१९ मध्ये एकट्या बॉक्सिंग खेळात ३ कोटींचं क्रीडा साहित्य परदेशातून आयात करण्यात आलं ज्यात १.३८ कोटींचा माल चीनमधून आला होता.
भारतातील क्रीडा उत्पादक कंपन्या या बहुतांश हॉकी स्टिक आणि बॉल, क्रिकेट बॉल, बॉक्सिंग इक्विपमेंट, चेसबोर्ड आणि इतर क्रीडा साहित्याची निर्यात करतात. परंतू या साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठीही त्यांना चीनवरच अवलंबून रहावं लागतं. कच्च्या मालापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत चीन प्रत्येक बाबतीत पुढे गेलेला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून काहीही साध्य होणार नाही. भारतात या गोष्टींचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या प्रकारचा अभ्यास व उद्योगासाठी वातावरण तयार करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केलं.