पीटीआय, शेन्झेन
भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शनिवारी शानदार रणनीतीसह खेळताना मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरिन अयुब आणि टॅन वी किओंग यांचा तीन गेममध्ये पराभव केला. यासह त्यांनी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) अंतिम फेरीत तिसर्‍यांदा धडक मारली. हंगामातील दुसरे विजेतेपद मिळवण्यापासून ते आता केवळ एक पाऊल दूर आहेत.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सा्त्विवक-चिराग जोडीला २०२३ आणि २०२५ मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शनिवारी झालेल्या उपांत्य लढतीत दुसर्‍या गेममधील पिछाडी भरून काढताना भारतीय जोडीने मलेशियन जोडीवर २१-१६, १८-२१, २१-११ असा विजय मिळवला. या सामन्यापूर्वी नूर आणि टॅन यांच्याविरुद्ध भारतीय जोडीने दोनही सामने जिंकले होते. त्यांनी २०२४ थायलंड आणि २०२५ मलेशियन खुल्या स्पर्धेत मलेशियन जोडीचा पराभव केला होता.

सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत खेळणार्‍या चौथ्या मानांकित सा्त्विवक-चिरागची सुरुवात खराब झाली. पहिल्या गेममध्ये ही जोडी ०-५ अशी पिछाडीवर होती. मात्र, त्यानंतर सलग सात गुण मिळवत त्यांनी ७-५ अशी आघाडी घेतली. नूरकडून झालेल्या तीन चुकांचा फायदा घेत भारतीय जोडीने आपली आघाडी १०-६ अशी वाढवली. मध्यंतरानंतर सा्त्विवकच्या आक्रमक स्मॅशसमोर मलेशियन खेळाडू अडचणीत आले. त्यांच्याकडून चुका झाल्या आणि याचा फायदा घेत सा्त्विवक-चिरागने गेम जिंकला.

दुसर्‍या गेममध्ये मलेशियन जोडीने पुन्हा वेगवान सुरुवात करत ४-० अशी आघाडी घेतली. मात्र, सा्त्विवक-चिरागने मध्यंतरानंतर गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी साधली. दोन्ही जोड्यांमध्ये १८-१८ पर्यंत चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेरीस मलेशियन जोडीने बाजी मारत सामना तिसर्‍या गेममध्ये नेला.
निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने ५-२ अशी आघाडी घेतली. सा्त्विवक-चिरागने रॅलींवर आपले वर्चस्व कायम राखत ११-४ अशी आघाडी घेत मध्यंतर गाठले. त्यानंतरही दमदार खेळ सुरू ठेवत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.