वृत्तसंस्था, चांगझो: भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टी यांनी चीन खुल्या स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) विजयाची संधी दवडली. सिंधू आणि आयुषने अनुक्रमे चार आणि तीन ‘मॅच पॉइंट’ची संधी वाया घालवली. या दोघांसह लक्ष्य सेनलाही पराभवाचा सामना करावा लागल्याने चीन खुल्या स्पर्धेत भारताचे आव्हान दुसर्या फेरीतच संपुष्टात आले.
सिंधूला चीनच्या चेन युफेईकडून तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात २१-१६, २०-२२, १८-२१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. सिंधूने गेल्याच आठवड्यात जपान बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते आणि तिच्याकडून पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. पहिल्या गेममध्ये ७-१३ अशा पिछाडीनंतर सिंधूने १६-१६ अशी बरोबरी साधली. यानंतर सलग पाच गुणांची कमाई करत तिने पहिला गेम जिंकला.
दुसर्या गेममध्ये सिंधूकडे २०-१६ अशी भक्कम आघाडी होती. मात्र, त्यानंतर तिने निराशाजनक कामगिरी केली. टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेनने दमदार पुनरागमन करताना गेम २२-२० असा जिंकला. मग निर्णायक तिसर्या गेममध्ये १७-१७ अशी बरोबरी असताना चेनने खेळ उंचावत बाजी मारली.
पुरुष एकेरीच्या लढतीत एनहात एन्गुएनने आयुषला १५-२१, २१-१३, २२-२० असे पराभूत केले. निर्णायक तिसर्या गेममध्ये आयुषकडे २०-१७ अशी आघाडी होती. मात्र, यानंतर एन्गुएनने अनुभव पणाला लावत सलग पाच गुण कमावले आणि सामन्यात बाजी मारली. अन्य लढतीत, कॅनडाच्या व्हिक्टर लाइने लक्ष्यवर २१-१९, २१-११ अशी मात केली. सामन्यात पहिल्या गेममध्ये गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली. दुसर्या गेममध्ये मात्र व्हिक्टरने वर्चस्व गाजवले.
