चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाने ९-२१, ११-२१ अशा दोन सेटमध्ये हरवलं, तर दुसरीकडे चीनच्या चेन युफेईने अटीतटीच्या लढतीत सिंधूचा ११-२१, २१-११, १५-२१ असा पराभव केला.

सिंधूने चेनविरुद्ध याआधी सहापैकी चार सामने जिंकले आहेत, मात्र आजच्या सामन्यात सिंधू चेनला हरवू शकली नाही. पहिल्याच सेटमध्ये चेनने आक्रमक खेळ करत मध्यांतरापर्यंत ११-५ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यामध्ये यश आलं नाही. दुसरा सेट जिंकून सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिसऱ्या सेटमध्ये चेनने वेळेत पुनरागमन करत सिंधूचं आव्हान मोडीत काढलं. दुसरीकडे श्रीकांत विरुद्ध मोमोटा हा सामनाही एकतर्फी झाला. संपूर्ण सामन्यात काही ठराविक मिनीटांचा खेळ सोडला तर श्रीकांत मोमोटोचा सामनाच करु शकला नाही.